शेतकऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने कर्जतमध्ये बंद - Closed in Karjat due to case filed against farmer | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने कर्जतमध्ये बंद

निलेश दिवटे
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवीत अत्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कर्जत : तालुक्यातील आंबिजळगाव येथील शेतकऱ्यांवर दाखल केलेला अॅट्रोसिटीचा खोटा गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारलेल्या कर्जत बंदला आज उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवीत अत्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येत्या दहा दिवसांत या प्रकरणी सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. बंद आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी केल्यानंतर हे आंदोलन दहा दिवसासाठी स्थगित करीत असल्याचे सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रा .तान्हाजी पाटील यांनी जाहीर केले.

तालुक्यातील आंबिजळगांव ते खातगाव हा रस्ता येथील शेतकरी लक्ष्मण निकत यांनी बंद केला होता. यानंतर सचिन शेटे यांनी अडवणूक केली म्हणून लक्ष्मण निकत,लहु निकत व बापू निकत यांच्यावर अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला. यातील संशयित आरोपी लक्ष्मण निकत व लहू निकत यांना पोलिसांनी अटक केली आहे.

मात्र सचिन शेटे यांनी दाखल केलेला गुन्हा खोटा आहे. राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा आरोप करीत तो त्वरित मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी आज सकल मराठा  समाज व सहविचार नागरिकांच्यावतीने कर्जत शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.

सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रा. तानाजी पाटील व मान्यवरांसह उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्यात बैठक झाली. या वेळी दहा दिवसांत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन सातव यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड,,नितीन तोरडमल, अॅड. धनंराज राणे, दीपक यादव, रामेश्वर तोरडमल,  दादा सुरवसे, राहुल नवले, अनिल निकत, महेंद्र धोडाद, विजय मोरे आदी उपस्थित होते.

याबाबत पोलीस योग्य दिशेने तपास करीत असून, येत्या दहा दिवसांत तो पूर्ण करून यातील दोषींवर कारवाई करण्यात येईल. सर्वांनी कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन संजय सातव यांनी केले आहे.

तालुक्यात जातीय सलोखा असून, सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत..आंबी जळगाव येथील हा गुन्हा हा राजकीय हेतूने प्रेरित आहे. वास्तविक आंबी जळगाव ते खातगाव रस्त्याचा प्रश्न सामंजस्याने सुटला असता, मात्र  त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. पोलिसांनी यातील सत्य शोधून यातील दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी प्रा. तान्हाजी पाटील यांनी केली आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख