नगरच्या उड्डाणपुलास अनिल राठोड यांचे नाव द्यावे - The city's flyover should be named after Anil Rathore | Politics Marathi News - Sarkarnama

नगरच्या उड्डाणपुलास अनिल राठोड यांचे नाव द्यावे

मुरलीधर कराळे
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

राठोड यांनी शहराच्या विकासासाठी तब्बल 25 वर्षे आमदार म्हणून प्रतिनिधीत्त्व करीत योगदान दिले आहे. हा उड्डाणपुल होण्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली. उपोषणे केली.

नगर : शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांचे नगर शहराच्या विकासासाठीचे योगदान मोलाचे आहेत. त्यामुळे त्यांची स्मृती नगरकरांना रहावी, यासाठी नव्याने होणाऱ्या उड्डाणपुलास राठोड यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

निवेदनात कदम यांनी म्हटले आहे, की नगर शहरात होणाऱ्या हाॅटेल यश पॅलेश ते हाॅटेल अशोका दरम्यानच्या उड्डाणपुलास स्व. अनिलभैय्या राठोड असे नाव द्यावे. राठोड यांनी शहराच्या विकासासाठी तब्बल 25 वर्षे आमदार म्हणून प्रतिनिधीत्त्व करीत योगदान दिले आहे. हा उड्डाणपुल होण्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली. उपोषणे केली. त्यांनी शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र सेवा केली आहे. 40 वर्षे त्यांनी या शहराला अहोरात्र सेवा दिली आहे. नगरकर हे योगदान कधीही विसरणार नाही. त्यांच्या स्मृती कायम रहाव्यात, यासाठी उड्डाणपुलास त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे कार्यकर्ते व नगरकरांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच महापाैरांना पाठविल्या आहेत.

अनिल भैय्याचे काम अविस्मरणीय : कदम

अनिल भैय्या हे शहराचा आत्मा होते. शिवसेनेचा श्वास होते. प्रत्येक नगरकरांच्या मनात त्यांचे वेगळे स्थान होते. सर्वसामान्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सर्वजण त्यांना आपला माणूस म्हणून मानत होते. त्यांच्या जाण्याने शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी शहरासाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. भविष्यात त्यांची स्मृती राहण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या सह्यांचे निवेदन लवकरच पाठविण्यात येणार आहे. सर्व नगरसेवक यासाठी पाठपुरावा करणार आहोत. उड्डाणपुलासाठी अनिलभैय्या प्रारंभीपासून आग्रही होते. नगर - पुणे मार्गावरील शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी उड्डाणपुलाचा पर्याय व्हावा, यासाठी ते आग्रही होते. त्यामुळे त्यांचे नाव या पुलास असणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया संभाजी कदम यांनी व्यक्त केली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख