गुड न्यूज ! सोमवारपासून नगर जिल्हा अनलाॅक, कोरोना पाॅझिटिव्ह रेट केवळ 4.30 टक्के  - City district unlocked since Monday, corona positive rate only 4.30 per cent | Politics Marathi News - Sarkarnama

गुड न्यूज ! सोमवारपासून नगर जिल्हा अनलाॅक, कोरोना पाॅझिटिव्ह रेट केवळ 4.30 टक्के 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 जून 2021

मुश्रीफ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आदींबाबत आढावा बैठक घेतली.

नगर : जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटिव्ह रेट 4.30 टक्के इतका आहे. राज्याच्या निकषानुसार हा रेट 5 टक्के पेक्षा कमी असल्याने नगर जिल्हा पहिल्या टप्प्यात येतो. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यात पूर्णपणे अनलाॅक करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज केली. (City district unlocked since Monday, corona positive rate only 4.30 per cent)

मुश्रीफ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आदींबाबत आढावा बैठक घेतली. आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, महापालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन वरील घोषणा केली.
 

मुश्रीफ म्हणाले, की ‘राज्य सरकारने ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत जारी केलेल्या निर्देशानुसार नगर जिल्ह्याचा समावेश टप्पा क्रमांक एकमध्ये असल्याने, सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरू करण्यात येणार आहेत. कोरोनाचा धोका संपलेला नसल्याने प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. व्यवहार सुरू झाल्यानंतर नियम पाळले नाही तर बाधितांची संख्या वाढून पुन्हा आपल्याला प्रतिबंध आणावा लागेल. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्‍यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही. सध्या राज्य शासनाने ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत जिल्ह्याचा रुग्ण बाधित होण्याचा दर आणि त्या जिल्ह्यात ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या निकषांवर, काही निर्बंध शिथिल करून व्यवहार पुन्हा सुरू करण्याबाबत निर्देश जारी केले आहेत. जिल्ह्याचा गत आठवड्यातील रुग्ण बाधित होण्याचा दर हा पाच टक्‍क्‍यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेडवर असणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असल्याने निर्बंध उठविण्यात येत आहेत.

... तर पुन्हा प्रतिबंध लागू करू

‘‘सध्या व्यवहार पूर्ववत करण्याचा निर्णय झाला असला, तरी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आदींचा वापर करणे आवश्‍यक आहे. बाधितांची संख्या वाढायला लागली तर जिल्ह्यात पुन्हा प्रतिबंध लागू करावे लागतील. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्‍यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे सध्याच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णवाढीचा वेग लक्षात घेऊन संभाव्य रुग्णवाढीनुसार नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कमी असल्याने आपल्याला त्याचा फटका बसला. ऑक्‍सिजन प्रकल्प ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी उभारले जात आहेत. शिर्डीत श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या वतीने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था, बालरुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात येणार आहेत. यापुढील काळात जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. केंद्र शासनाकडून पुरेसा ऊसपुरवठा व्हावा, यासाठी राज्य शासन पाठपुरावा करीत आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.

सदावर्तेंची भूमिका कायम समाजविरोधी ः मुश्रीफ

मराठा आरक्षणाला आवाहन देणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी शासकीय कार्यालयावर भगवा झेंडा फडकविण्यास विरोध दर्शविला आहे. राष्ट्रध्वजच फक्त शासकीय कार्यालयावर फडकावला पाहिजे, असे व्यक्त सदावर्ते यांनी केलेले आहेत. त्यावर पालकमंत्री म्हणाले, की सदावर्ते यांची कायम समाजविरोधी भूमिका असते. शिवराज्यभिषेक दिनानिमित्त हा भगवा ध्वज फडकावला जात आहे.

हेही वाचा..

शासकीय कार्यालयावर भगव्यास सदावर्ते यांचा विरोध

 

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख