The citizens of Jamkhed gave love to foreigners | Sarkarnama

जामखेडकरांचा जिव्हाळा अन गावच्या ओढीने त्यांना अश्रू अनावर

वसंत सानप
शुक्रवार, 22 मे 2020

जामखेडकरांनी दिलेली मायेने पाय निघेना अन आप्तेष्टांच्या ओढीने रहावेना. अत्यंत भावनावश झालेल्या त्या परप्रांतीयांना अश्रू अनावर झाले. काहीजण ढसाढसा रडले. अन काहीशा जड पावलांनी त्यांनी जामखेड सोडले.

जामखेड : नियतीने पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यात पाठविले. तेथे कोरोनाच्या लाॅकडाऊनने पुन्हा मायदेशी धाडले. अडचणीच्या काळात गेले दोन महिने अनोळखी व्यक्तींनी मायेची उब दिली. आता ते मोकळे झालेत, गावी जाण्यासाठी. पण जामखेडकरांनी दिलेली मायेने पाय निघेना अन आप्तेष्टांच्या ओढीने रहावेना. अत्यंत भावनावश झालेल्या त्या परप्रांतीयांना अश्रू अनावर झाले. काहीजण ढसाढसा रडले. अन काहीशा जड पावलांनी त्यांनी जामखेड सोडले. 

रक्ताच्या नात्यात ऐकमेकांबद्दल आकर्षण, प्रेम, जिव्हाळा असणे स्वाभाविक आहे. मात्र  व्यक्ती आडचणीत आहेत आणि त्यांना आपण मदतीसाठी धावून गेले पाहिजे, अशी भावना निर्माण होणे, तेथेच खरे माणुसकीचे दर्शन घडते. असाच प्रकार जामखेडमध्ये पहायला मिळाला. लाॅकडाऊनमुळे 13 राज्यातील साडेपाचशे व्यक्तींना दोन महिण्यांपासून जामखेडकरांचा पाहुणचार मिळाला. मानुसकीचे दर्शन घडले. संकटप्रसंगी मिळालेला प्रेमाचा जिव्हाळा, दाखविलेली आपुलकीचा 'आधार' परराज्यातील नागरिकांना जगण्याचे 'बळ' देणारा ठरला. प्राप्त परिस्थितीशी लढण्याची त्यांना ताकत मिळाली. त्यांच्यासाठी मिळालेली ही मदत  लाखमोलाची ठरली. या आधाराचे 'मुल्य' आभाळाऐवढे असल्याच्या प्रतिक्रिया बिहारच्या नागरिकांनी मायदेशी जाताना व्यक्त केल्या. 

घराकडे जाण्याचा मार्ग मोकळा होऊनही आमचा येथील माणुसकीच्या दर्शनाने पाय निघत नसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली, मात्र कुटुंबियांकडे जायला मिळतेय, हा आनंदही ते आपल्या चेहऱ्यावर लपवू शकले नाहीत. या काळात आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी त्यांच्या ''पालकत्वाची'' जबाबदारी लिलया पेलली.

सर्वाधिक उत्तरप्रदेशातील
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामखेडचे तब्बल दोन महिने हाॅटस्पाॅट व उर्वरित काळात लाॅकडाऊनमुळे सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहिले. येथे कलाकुसरीच्या बळावर काम करुन हतावरचे पोट भरणाऱ्या तेरा राज्यातील 550 व्यक्तीं लाॅकडाऊनमुळे जामखेडमध्येच अडकून पडलेले होते. यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेशातील म्हणजे तब्बल 243 जण आहेत. यापैकी दीडशे व्यक्तींची प्रशासनाने नुकतीच त्यांच्या मायदेशी पाठवण केली. या वेळी ते भावूक झाले. अनेकांनी आश्रुला वाट मोकळी करुन दिली. येथे मिळालेला जिव्हाळा आणि घराकडे जायला मिळणारा आनंद, अशा दोन्ही प्रसंगाची प्रचिती आली. 

अधिकाऱ्यांचे कष्ट अन नागरिकांची साथ
बिहार, राजस्थान, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, ओडिशा, वेस्टबंगाल, तेलंगणा, दिल्ली, आंध्रप्रदेश या राज्याबरोबरच नेपाळच्या सहा व्यक्तींचा समावेश होता. फर्निचर, पी.व्ही.पी, इलेक्ट्रीकल, कलर, बांधकाम व अन्य व्यावसायाची संबंधित काम करणारे हे परराज्यातील मजूर तसेच मदरसातील काही विद्यार्थ्यांचाही यामध्ये समावेश होता. या नागरिकांपैकी काहीजण अनेक वर्षांपासून येथे राहतात. त्यांनी स्वतःचे हक्काचे घर घेऊन येथे आपले 'बस्तान'  बसविले आहे, तर बहुतांशी भाडोत्री राहतात. दररोज काम करायचे आणि मिळणाऱ्या रोजगारावर आपला चरितार्थ चालवायचा, असा यांचा दिनक्रम, मात्र तब्बल दोन महिण्यांपासून हा दिनक्रम थांबला. देश थांबला, राज्य थांबलं आणि गावही थांबलं. मात्र पोट काही थांबले नाही. हाताला काम नाही, खिशात दाम नाही, त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी निर्माण झालेले आव्हाण अधिकाऱ्यांनी पेलले. सर्व विभाग प्रमुख अधिकारी-कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन हे काम चोख पार पडले. त्यांना जामखेडकरांनी स्वयंप्रेरणेने मदत केली.

अनेक हात सरसावलेहिंदुस्थान-प्रतिष्ठानचे पांडूराजे भोसले यांनी लाॅकडाऊन सुरु झाल्यापासून अन्नछत्र सुरु केले आहे. गरजुंना दररोज दोन वेळचे जेवण मिळते आहे. इतर दातेही धावून आले.  आमदार रोहित पवार यांनी स्वतः मदत केली. निरनिराळ्या स्वयंसेवी संस्थाचीही मदत मिळून दिली. काहींनी आपले कर्तव्य समजून स्वतःचे नाव 'गुप्त' ठेवून केलेली मदत येथील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे हुरुप वाढविणारे ठरले. या परराज्यातील नागरिकांना प्रशासनाने वेगवेगळ्या मार्गाने आधार देऊन सांभाळले, तर येथील दानशूर व्यक्तींनी चालवविलेल्या अन्नछत्रामुळे दोन वेळची त्यांची भुक भागविण्याचे पुण्यकर्म घडले. या परराज्यातील व्यक्तींना मिळालेल्या या मदतीमुळे त्यांनी क्रतार्थता व्यक्त केली.

त्यांचा मायदेशी जाण्याचा मार्ग मोकळा ः नाईकवाडे

परराज्यातील व्यक्तींना त्यांच्या 'मायदेशी' पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला असून, प्रशासनाकडून त्याची तयारी सुरू आहे. यापैकी 62 व्यक्तींना मागील आठवड्यात त्यांच्या राज्यात पाठवले, तर काल (गुरुवारी) बिहारच्या 87 व्यक्तींना त्यांच्या गावाला पाठवले. उर्वरित 400 व्यक्तींना पुढील काही दिवसांत पाठविण्यात येणार असल्याचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले. या सर्वांच्या प्रवासाचा खर्च शासनस्तरावरुन होत असल्याचे ही त्यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख