"ड्रॉप' अन्‌ "ट्रॅप' ! नगरच्या विकासाच्या `झारीतील शुक्राचार्य`

सोन्याच्या मोहापायी लाखो रुपयांना लुटणाऱ्या टोळीमुळे अनेक कुटुंबे बरबाद होत आहेत. "हनी ट्रॅप'सारखे नाजूक विषय आपल्याच आसपास होऊन अनेक जण त्याला बळी पडत आहेत. ट्रॅप आणि ड्राॅप यामुळे नगरचे नाव बदनाम होत असून, ते विकासातील शुक्राचार्य ठरत आहेेत.
mahila2
mahila2

नगर : पुरोगामी विचारसरणीचा नगर जिल्हा. विविध संत, नाथसंप्रदाय, संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. सहकाराच्या दृष्टीने आशिया खंडात मानाचा तुरा रोवणारा हा जिल्हा. महाराष्ट्राच्या राजकारणात कायम महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या या जिल्ह्याला "ट्रॅप' आणि "ड्रॉप'चे उंदीर लागलेत. ते आतून पोखरताहेत. नाजूक विषयाशी संबंधित असल्याने कुणी बोलत नाही; परंतु त्यामुळे जिल्ह्याच्या इज्जतीचा पंचनामा थेट राज्यात होतोय.

इतर वेळी जिल्ह्यातील सामाजिक प्रश्नांचा कळवळा आणणारे पत्रकपुढारी, राजकारणातील डॉन, मिरवून घेणारे राजकारणी, महिलांच्या प्रश्नांवर इतर वेळी सडेतोडपणे रस्त्यावर उतरणाऱ्या महिला संघटना, नगरचा कळवळा केवळ प्रसिद्धीसाठी दाखवून देणारे कार्यकर्ते आता झोपा काढत आहेत काय? सोन्याच्या मोहापायी लाखो रुपयांना लुटणाऱ्या टोळीमुळे अनेक कुटुंबे बरबाद होत आहेत. "हनी ट्रॅप'सारखे नाजूक विषय आपल्याच आसपास होऊन अनेक जण त्याला बळी पडत आहेत, हे माहिती असूनही सर्व जण मूग गिळून का बसलात? बाहेर पडा. अशा टोळ्या नेस्तनाबूत करा. जिल्ह्याची मान उंचावलेलीच ठेवण्यासाठी हे करावेच लागेल. 

सोन्याचा "ड्रॉप' 
नगर जिल्ह्यात, विशेषतः श्रीगोंदे तालुक्‍यात यापूर्वी अनेकदा सोन्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडविल्याची उदाहरणे आहेत. त्या ठरावीक टोळ्या आहेत. चोरून आणलेले सोने अत्यंत कमी किमतीत विकायचे, असे सांगून व्यापाऱ्यांना भुलवायचे. एखाद्या ओसाड ठिकाणी बोलवायचे. तेथे त्यांच्याकडून लाखो रुपयांची लूट करून बनावट सोने त्याच्या हवाली करायचे. प्रसंगी काहीच न देता हाकलून लावायचे, हे प्रकार वर्षानुवर्षे घडत आहेत. त्याला जिल्ह्यातीलच नव्हे, राज्यातील अनेक जण बळी पडत आहेत. विशेषतः मुंबईतील सोने व्यापाऱ्यांवर या टोळीची विशेष नजर असते. या प्रकरणांमध्ये घेणारा व देणारा हे दोघेही बेकायदा व्यवहार करीत असल्याने याबाबतचे गुन्हे लवकर दाखल होत नाहीत. त्यामुळे अशा टोळ्यांचे फावते. परंतु त्यामुळे काही कुटुंबे उद्‌ध्वस्त होतात. अनेक व्यापाऱ्यांवर लुटले गेल्याने आत्महत्येची वेळ येते. अशा वेळी संबंधित कुटुंब उघड्यावर येते. हे थांबविण्यासाठी नागरिकांनी सतर्कता दाखविली, तर ते शक्‍य आहे. सोन्याच्या या घटनांना "ड्रॉप' म्हणतात. या प्रकारामुळे नगरचे नाव मात्र राज्याच्या नकाशावर लाल अक्षरात नोंदले गेले. नगर जिल्ह्यात असे "ड्रॉप' सहजासहजी घडतात. आपल्या जिल्ह्याची ओळख अशा मार्गाने व्हावी, हीच मोठी शोकांतिका आहे. 

"हनी ट्रॅप'चा राक्षस 
जिल्ह्यात "हनी ट्रॅप' हा प्रकार बोकाळतो आहे. प्रेमाच्या जाळ्यात एखाद्याला ओढायचे. त्याचे अश्‍लील फोटो, व्हिडिओ घेऊन त्याच्याकडून लाखो रुपयांची लूट करायची. हा काही लोकांचा धंदा बनलाय. अत्यंत गुप्तपणे चालणाऱ्या या चक्रव्यूहात एकदा एखादी व्यक्ती फसली, की ती कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडू शकत नाही. कारण तक्रार द्यावी, तर स्वतःचीच इज्जत चव्हाट्यावर येते. तक्रार नाही दिली, तर हा "बकरा' समजून समोरील टोळी वारंवार त्याच्याकडून खंडणीची मागणी चालूच ठेवते. आपल्या कुटुंबातील लेकरा-बाळांच्या पोटाला चिमटा घेऊन केलेली कमाई या टोळीच्या हवाली करावी लागते. अर्थात फसणाराही त्याच "लायकीचा' असतो, परंतु प्रेमाच्या जाळ्यातून अनेक जण वाचू शकले नाहीत, हे दुर्लक्षून चालत नाही. लुटले गेलेल्यांना दोष देण्यापेक्षा लुटारूंचे पितळ उघडे करायला हवे. 

पोलिस, पुढाऱ्यांचा सहभाग घातक 
"ट्रॅप' किंवा "ड्रॉप' अशा प्रकरणांमध्ये स्थानिक राजकीय नेते, पोलिस अधिकारी यांचा अनेकदा पडद्यामागून सहभाग असतो. आरोपींना बळ दिले नाही, तर त्याकडे दुर्लक्ष करून घटना होऊ देणे, हा एक प्रकारचा सहभागच असतो. संबंधित आरोपींची ही मंडळी लाभार्थीही असतात. नेमके हेच समाजासाठी घातक आहे. अशा टोळ्यांना आश्रय देणारे नेते, पोलिस अधिकारीही ठेचून काढले पाहिजेत. आरोपींचे बळ वाढविणारे हे घटक उघडे पाडले पाहिजेत. सध्या सुरू असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणातही तथाकथित पुढारी-कार्यकर्ता सक्रिय आहे. पोलिस व कर्मचारीही या प्रकरणात पाठबळ देणारे आहेत. अशा लोकांच्या नांग्या वेळीच ठेचल्या नाहीत, तर या टोळ्या सोकावतात. मोठे गुन्हे करण्यास त्यांची हिंमत वाढते. त्यामुळे अशा घातक वृत्तींपासून सावध राहिले पाहिजे. 

दोन्ही घटनांत लाभार्थीच 

"ट्रॅप' किंवा "ड्रॉप' या दोन्ही गुन्हेगारी विश्वात दोन्ही बाजूंनी लाभार्थी असतात. सोन्याच्या ड्रॉपमध्ये सोने घेणाऱ्याला अत्यंत कमी पैशात जास्त सोने मिळवून तो जादा कमाईचे स्वप्न पाहतो. तर सोने देणाऱ्यानेही ते चोरून आणलेले असते. त्यामुळे तोही कमी श्रमात जास्त दाम मिळविण्याची अपेक्षा करतो. "चोराची लंगोटी' समजून तो चोरलेले सोन्याचे मिळेल ते दाम घेऊन मोकळा होऊ इच्छितो. अशा प्रकरणात फसले गेल्यास मात्र हे प्रकरण पोलिसांपर्यंत येत नाही. पोलिसांकडे जावे, तर स्वतःच उघडे पडून स्वतःवरच गुन्हा दाखल होणार असतो. त्यामुळे हे प्रकरण दडपले जाते. परंतु फसले गेलेल्या व्यक्तीला मोठा तोटा सहन करावा लागतो, की जो त्याचे कुटुंब "बरबाद' करणारा ठरतो. 

"हनी ट्रॅप'सारख्या घटना तर अत्यंत नाजूक असतात. परस्त्रीशी प्रेमाचे चाळे करू इच्छिणारे "नालायक', पत्नीशी बेइमानी करणारे "गद्दार' हे या प्रकरणात शिकार होतात. स्वतःच मोठी चूक केलेली असल्याने ती जगासमोर उघडी करायची कशी, पोलिसांत जायचे कसे, असा प्रश्न संबंधितांना पडतो. मग त्यासाठी "बकरा' झालो तरी चालेल, घराची राखरांगोळी झाली तरी चालेल, अशा मनःस्थितीत ही मंडळी येते. "हनी ट्रॅप'च्या सध्या सापडलेल्या प्रकरणातील अशाच एका "बकऱ्या'ची पत्नी कॅन्सरने तडफडते आहे. तिच्यावर उपचार करण्यासाठी जमवलेला पैसा त्याने प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्या "महामायां'वर उधळला, हे किती मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. पण अशा घटना समाजाला पोखरणाऱ्या असतात. समाजाला हे दिसते; परंतु त्यांचाही नाइलाज होतो. 

प्रशासनाचे हात बांधलेले; पण... 

जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलिस प्रशासनाला काहीच करता येत नाही. त्यांचे हात कायद्याने बांधलेले असतात, ही वस्तुस्थिती आहे. गुन्हे दाखल करण्यासाठी जोपर्यंत कुणी पुढे येत नाही, तोपर्यंत त्यांना तपासात अडचणी येत असल्या, तरी काही गुन्ह्यांची वस्तुस्थिती जाणून पोलिसच तक्रारदार होऊ शकतो. समाजाच्या भल्यासाठी हे करण्यास त्यांना अधिकार असतो. तथापि, "हनी ट्रॅप'सारख्या प्रकरणात पोलिसच गुंतला असेल, तर हे प्रकरण पुढे कसे सरकायचे. त्यामुळे जनतेच्या कल्याणासाठी ब्रीदवाक्‍य घेऊन आलेल्या पोलिसांनी कोणाला वाचविण्यासाठी तोंड दडवू नये. निर्भीडपणे या प्रकरणाचा पर्दाफाश करावा, अशीच मागणी सर्वसामान्यांतून होत आहे. 

जिल्ह्याच्या इज्जतीसाठी... 

इतर वेळी केवळ प्रसिद्धीसाठी अनेक पत्रकपुढारी गवगवा करतात. आंदोलनांचे नाटक करून आपला स्वार्थ साधतात. अशा पत्रकपुढाऱ्यांची आता दातखिळी का बसली आहे? महिलांवर अत्याचार होत असल्याच्या नावाखाली प्रसिद्धीला हपापलेल्या काही संघटना आता कुठे दडून बसल्या आहेत? "हनी ट्रॅप'मध्ये केवळ पुरुषच अडकत नाही, तर अनेक गरीब मुलींनाही बळी दिले जात आहे. अश्‍लील फोटो, व्हिडिओमुळे त्या अनेकदा त्या टोळीच्या इशाऱ्यावर बळी ठरत आहेत. अशा वेळी आता समाजानेच पेटून उठावे. आपल्या अवतीभवती घडत असलेल्या या घटनांविरोधात आवाज उठवावा. शक्‍य असेल, ती माहिती पोलिसांना देऊन अशा लोकांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी मदत करावी. आपला जिल्हा चांगला आहे. राज्यात वेगळी इमेज तयार झालेली आहे. ही इमेज ढासळू देऊ नये. जिल्ह्याची इज्जत चव्हाट्यावर आणू नये, इतकेच..! 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com