पारनेर नगरपंचायतीवर झेंडा रोवण्यासाठी लंके-औटी यांच्यात चुरस - Churas between Lanka-Auti to hoist the flag at Parner Nagar Panchayat | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

पारनेर नगरपंचायतीवर झेंडा रोवण्यासाठी लंके-औटी यांच्यात चुरस

मार्तंड बुचुडे
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

तांत्रिकदृष्ट्या सध्या शिवसेनेच्या ताब्यात सत्ता असली, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने आमचाच आगामी काळात आमच्याच पक्षाचा नगराध्यक्ष होणार, अशी घोषणा नुकतीच केली आहे.

पारनेर : कोरोणाच्या पार्श्वभूमिवर नोव्हेंबरअखेर मुदत संपणाऱ्या पारनेर नगरपंचायतची निवडणूक कधी होईल, हे सांगता येत नाही. मात्र राज्यातील नोव्हेंबर ते डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणार्‍या नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरु केली आहे. त्यामुळे पारनेरचे राजकिय वातावरण तापू लागले आहे.

तांत्रिकदृष्ट्या सध्या शिवसेनेच्या ताब्यात सत्ता असली, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने आमचाच आगामी काळात आमच्याच पक्षाचा नगराध्यक्ष होणार, अशी घोषणा नुकतीच केली आहे. तर भारतीय जनता पक्षानेही स्वबळाचा नारा दिला आहे, त्यामुळे आता ही निवडणूक चांगलीच गाजाणार, अशी चिन्ह दिसत आहेत.

पारनेर नगरपंचायतीची मुदत 25 नोव्हेंबर अखेर संपणार आहे. राज्यातील  डिसेंबर अखेर मुदत संपणार्‍या नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरु केली आहे. आता प्रभाग रचना, प्रभागांची संख्या, प्रभागनिहाय अनुसूचित जाती व जमातीची  लोकसंख्या त्यांचे क्षेत्र, सीमा, नकाशा तसेच आरक्षण या बाबी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम 24 डिसेंबर अखेर पूर्ण करावयाचा आहे. या मुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे माजी आमदार व विधानसभाचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरणार आहे.

पारनेर शहरात ते राहात असल्याने व सध्या त्यांच्याच ताब्यात सत्ता असल्याने त्यांना आपले राजकीय वजन दाखविण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. तर औटी यांच्या बालेकिल्ल्यात आमदार निलेश लंके यांनी पारनेर नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता आणण्यासाठी चंग बांधला आहे. पुढील नगराध्यक्ष आमच्याच पक्षाचा होणार, हे या पुर्वीच जाहीर केले आहे. पारनेरचा पाणी प्रश्न मीच सोडविणार आहे, तसेच शहराचा गेली 15 वर्षापासून खुंटलेला विकासही मीच करून शहराचा चेहरा मोहरा बदलविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

भारतीय जनता पक्षानेही स्वबळावर नगरपंचायतीची निवडणूक लढविण्याचा निर्धार केला. तर उद्योजक चंद्रकांत चेडे व अर्जुन भालेकर यांनी अपक्षांना बरोबर घेत शहरातील नाराज व चांगले तरूण कार्यकर्ते एकत्र करत तिसरी आघाडी तयार करून पक्षविरहीत तिसऱ्या अघाडीमार्फत निवडणूक लढविण्याचा विचार करत आहेत. सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे. आताच अनेक कार्यकर्ते पक्षाचा विचार न करता मीच उमेदावर, याप्रमाणे आपल्या प्रभागात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. गाठीभेटी व एकमेंकाना मदत करण्यास सुरूवात केली आहे. एकूणच शहरातील राजकिय वातावरण आता तापू लागले आहे.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख