बापाने अत्याचार करून चिमुरडीचा केला खून, राहुरी तालुक्यात नात्याला काळीमा - Chimurdi was brutally murdered by his father, Kalima in Rahuri taluka | Politics Marathi News - Sarkarnama

बापाने अत्याचार करून चिमुरडीचा केला खून, राहुरी तालुक्यात नात्याला काळीमा

विलास कुलकर्णी
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

मुलीच्या अपहरणाचा बनाव रचला. मात्र, मुलीच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी अहवालात सर्व बाबी स्पष्ट झाल्यावर राहुरी पोलिसांनी आज रात्री उशिरा नराधम बापाला बेड्या ठोकल्या. 

राहुरी : तालुक्‍यातील एका गावात ऊसतोडणीसाठी आलेल्या नराधम बापाने स्वत:च्या साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर दारूच्या नशेत अनैसर्गिक अत्याचार केला. नंतर तिला विहिरीत ढकलून दिले. पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. आपले दुष्कृत्य लपविण्यासाठी मग त्यानेच पोलिसांत खोटी फिर्याद देत, मुलीच्या अपहरणाचा बनाव रचला. मात्र, मुलीच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी अहवालात सर्व बाबी स्पष्ट झाल्यावर राहुरी पोलिसांनी आज रात्री उशिरा नराधम बापाला बेड्या ठोकल्या. 

तालुक्‍यातील एका गावात ऊसतोडीसाठी शेजारील तालुक्‍यातून कुटुंब आले होते. त्यांच्या घरातील चिमुकलीचे शुक्रवारी (ता. 12) रात्री अपहरण झाल्याची फिर्याद तिच्या बापाने पोलिसांत दिली. मात्र, फिर्यादी बापाच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. महिला पोलिसांनी मृत बालिकेच्या आईला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, "घटनेपूर्वी नवऱ्यासोबत कडाक्‍याचे भांडण झाल्यावर तो रात्री साडेदहा वाजता मुलीला घेऊन बाहेर पडला. रात्री 11 वाजता एकटाच घरी परतला. मुलीबाबत विचारणा केल्यावर शोधायला लागला,' असे आईने सांगितले. मुलीबरोबर असणारी शेवटची व्यक्ती म्हणून पोलिसांनी नराधम बापाला काल (सोमवारी) रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले. 

दरम्यान, बालिकेचा मृतदेह नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला होता. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यात या चिमुकलीवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लगेच पोलिसांनी नराधम बापाच्या मुसक्‍या आवळल्या. याबाबत पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी या बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

बालिकेवर अनैसर्गिक अत्याचार

मृत बालिकेवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे उत्तरीय तपासणी अहवालात म्हटले आहे. व्हिसेरा राखून ठेवला आहे. घटनेच्या दिवशी व मृत पीडित बालिकेबरोबर शेवटची व्यक्ती तिचा बापच होता. त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे, असे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकारणाची चर्चा महाराष्ट्रभर होत आहे.

 

हेही वाचा... 
श्रीरामपुरात चोरट्यांचा धुमाकूळ 

श्रीरामपूर : शहर व परिसरासह ग्रामीण भागात लहान-मोठ्या चोऱ्या वाढल्या आहेत. तसेच, दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास थंडावल्याने चोरांचे धाडसही वाढत आहे. त्यामुळे तालुक्‍यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. 

घरफोडी, दुकानांतील विविध वस्तूंसह मोबाईलचोरी व दुचाकीचोरीच्या घटना ताज्या आहेत. काही दिवसांपूर्वी येथील प्रभाग सातमध्ये अज्ञात चोरट्यांनी एका घरात घुसून जबरी चोरी केली. घरातील एका महिलेला मारहाण करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम त्यांनी लांबविली. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळाला भेट देऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. नगर येथून श्‍वानपथकासह ठसेतज्ज्ञांना पाचारण करून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु अनेक दिवस उलटूनही अद्याप तपास लागलेला नाही. त्यानंतर काही दिवसांनी चोरट्यांनी पुन्हा शहरातील बसस्थानक परिसरातील राधिका हॉटेलसमोरील कासलीवाल मोबाईल शॉपीचे शटर तोडून सुमारे आठ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. त्यानंतर संबंधित व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, या घटनेतील आरोपींना पकडण्यातही पोलिसांना यश आलेले नाही. 

शहरात चोरीच्या घटना वाढत असल्याने व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांचा तपास थंडावल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. शहर परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. शहर परिसरात विविध 30 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे चोरीच्या घटना रोखण्यात त्याचा चांगला फायदा होत असल्याचे यापूर्वी सांगितले जात होते. मात्र, सर्व कॅमेरे सुस्थितीत असूनदेखील चोरटे चोरी करण्याचे धाडस करीत असल्याने, पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच सवाल उपस्थित केला जात आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख