Chief Minister Uddhav Thackeray's popularity in the first five, Thorat did Kaituk | Sarkarnama

देशभरातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांत ठाकरे पाचव्या क्रमांकावर, थोरातांनी केले काैतुक

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 जून 2020

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना मिळाली आहे. त्यांना 82.96 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. दुसऱ्या क्रमांकाची पसंती छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेष बघेल यांना मिळाली.

नगर : देशभरातील मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता पाहण्यासाठी एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्या पाचमध्ये आहेत. याबद्दल काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे विशेष काैतुक केले आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना थोरात म्हणाले, की देशभरातील राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्या पाचमध्ये आले आहेत, ही गोष्ट आमच्या सर्वांसाठी, महाराष्ट्रासाठी गाैरवास्पद आहे. एक नेतृत्त्व कसे करावे, तीन पक्षाचे सरकार असताना,  वेगवेगळ्या विचारधारा असताना सर्वसामान्य माणूस केंद्रीभूत ठेवून काम कसे करता येईल, त्याचे मूर्तीमंत उदाहरण सध्याचे राज्य सरकार आहे. त्याचे नेतृत्त्व यशस्वीरित्या करणारे मुख्यमंत्री ठाकरे आहेत. त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

देशभरातील नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आयएएनएस व सी व्होटर्स या संस्थेने संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच आला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकप्रियतेच्या पाचव्या क्रमांकावर आहेत. या संस्थेने देशभरातील विविध राज्यांतील जनतेकडून एक सर्वेक्षण केले होते. पहिल्या क्रमांकाची पसंती ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना मिळाली आहे. त्यांना 82.96 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. दुसऱ्या क्रमांकाची पसंती छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेष बघेल यांना मिळाली असून, त्यांना 81.6 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तीन नंबरला केरळचे मुख्यमंत्री पी. वीजयन यांना 80.28 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. चार नंबरवर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी आहेत. त्यांना 78.52 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. पाचनंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून, त्यांची लोकप्रियता 76.52 टक्के आहे. या यादीत सहाव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असून, त्यांची लोकप्रियता उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा कमी असल्याचे सिद्ध झाले आहे. केजरीवाल यांना 74 टक्के मतदान आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. लाॅक डाऊनच्या काळात काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी विशेष काळजी घेतली. त्यामुळे सर्व काळ शांततेत गेला. शिवाय कोरोनाचे रुग्ण वाढू न देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष प्रयत्न केले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी वारंवार जनतेशी संवाद साधून जनतेला धीर दिला. आरोग्य कर्मचारी, पोलिस, प्रशासकीय अधिकारी, कोरोना वाॅरिअर यांना वारंवार प्रोत्साहन देऊन या संकटाचा सामना करण्यासाठी धीर दिला. त्यामुळे त्यांची लोकप्रियता पहिल्या पाच मध्ये आल्याचे मानले जाते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख