मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या `त्या` जमिनीचा वांदा ! - Chief Minister Uddhav Thackeray's land dispute | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या `त्या` जमिनीचा वांदा !

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 जुलै 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे सुमारे 22 गुंठे असलेले हे प्लाॅट भंडारदरा धरणाजवळील मुरशेत या गावातील आहेत. मुख्यमंत्र्यांबरोबरच इतरही पाच-सहा जणांच्या नावे तेथे प्लाॅट आहेत.

नगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे असलेली व त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान संपत्ती जाहीर करताना दर्शविलेल्या अकोले तालुक्यातील जमिनीचा वांदा झाला आहे. त्यांच्यासह इतर सहा-सात जणांच्या जमिनीचा ताबा सध्या आदिवासी लोकांकडे आहे. ते आता द्यायला तयार नाहीत. आज मोजणी करण्यासाठी आलेल्या एकाला लोकांनी पिटाळून लावल्याने हा प्रकार उघडकीस आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान नामनिर्देशनपत्रामध्ये संपत्ती जाहीर करताना नगर जिल्ह्यातील जमिनीचा उल्लेख केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे सुमारे 22 गुंठे असलेले हे प्लाॅट भंडारदरा धरणाजवळील मुरशेत या गावातील आहेत. मुख्यमंत्र्यांबरोबरच इतरही पाच-सहा जणांच्या नावे तेथे प्लाॅट आहेत. त्या जमिनी वर्षानुवर्षे आदिवासी लोक वापरतात. त्यांच्याच आजोबा-पणजोबांनी या जमिनी 1960 साली सरकारला विकल्या होत्या. तेथे भंडारदरा हिलस्टेशन होण्यासाठी सरकारने विशेष बाब म्हणून कलाकार, लेखक, कवी अशा लोकांना या जमिनी दिल्या होत्या. त्यामुळे उताऱ्यांवर संबंधित लोकांची नावे आहेत. परंतु 55 वर्ष उलटूनही या व्यक्ती तिकडे फिरकल्या नाहीत. या जमिनी राखल्या व त्यातून आपले उपजीविकेचे साधन तयार केले. त्यामुळे त्या जमिनी सोडण्यास आदिवासी तयार नाहीत.

उतारे नावे असलेल्यांपैकी संदीपकुमार जैन आज तेथे मोजणी करण्यासाठी आले होते. त्या वेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अशोक भांगरे यांच्या नेतृत्त्वाखाली आदिवासी लोकांनी आंदोलन केले. त्यांना मोजणी न करू देता संबंधितांना पिटाळून लावले. आज भर पावसात झालेले हे आंदोलन पाहून जैन व संबंधित लोक निघून गेले. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, तहसीलदार मुकेश कांबळे उपस्थित होते. आदिवासींचा संताप पाहता अधिकारी हात हलवीत परत गेले.

पैसे परद देण्यास तयार

वर्षानुवर्षे या जमिनींवर आदिवासी लोक आपला उदर्निवाह करीत आहेत. ज्यांच्या नावे जमिनी आहेत, ते लोक कधीही फिरकले नाही, की त्यांनी शासनाकडे त्याचे पैसेही भरले नाहीत. काही लोकांनी तब्बल 40 वर्षानंतर थोडेफार पैसे भरले. परंतु कोणीही इकडे फिकले नाही. त्यामुळे त्यांचा या जमिनीशी काही संबंध नाही. अत्यल्प दरात त्या वेळी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, त्यांचेच वंशज या जमिनी परत मागत आहेत. त्यात वावगे काही नाही. त्यामुळे आता या जमिनी हे लोक देणार नाहीत. ही जमीन नवीन शर्थीनुसार आहे. आम्ही घेतलेले पैसे परत देण्यास तयार आहोत, अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या.

ठाकरे यांचे स्मारक व्हावे : भांगरे

या जमिनीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही काही प्लाॅटस आहेत. ते आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे होते. ते आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावर आहेत. तेथे मुख्यमंत्र्यांनी आता बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक करावे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. त्यांनी हा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करू, अशी भूमिका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अशोक भांगरे यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख