मुख्यमंत्री ठाकरे यांची `माझे कुटुंब-माझी जबाबदारी` संकल्पना चांगली ः हजारे - Chief Minister Thackeray's concept of 'my family' is good: Hazare | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री ठाकरे यांची `माझे कुटुंब-माझी जबाबदारी` संकल्पना चांगली ः हजारे

सनी सोनावळे 
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

राळेगण सिद्धी (ता. पारनेर) येथे `माझे कुटुंब- माझी जबाबदारी` या उपक्रमाअंतर्गत जेष्ठ समाजसेवक यांची तपासणी करून या उपक्रमाची सुरुवात केली.

टाकळी ढोकेश्वर : राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव हे माझे कुटुंब आहे. या पद्धतीने सर्वांनी काम केले, तर कोरोनाबाबतची लोकांची भिती नाहिसी होईल व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल, अतिशय चांगली संकल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली असल्याचे मत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

राळेगण सिद्धी (ता. पारनेर) येथे `माझे कुटुंब- माझी जबाबदारी` या उपक्रमाअंतर्गत जेष्ठ समाजसेवक यांची तपासणी करून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यावेळी हजारे बोलत होते. या वेळी तहसीलदार ज्योती देवरे, तालुका आरोग्य अधिकारी प्रकाश लाळगे, विस्ताराधिकारी पोपट यादव, माजी सरपंच  जयसिंग मापारी, शाम पठाडे आदी उपस्थित होते.

हजारे म्हणाले, की आरोग्य विभागासह सर्व प्रशासकीय कर्मचारी चांगले काम करत आहेत. हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात यावा. तहसीलदार देवरे यांनी कोरोना परिस्थिती खूप चांगली हाताळली. तुमच्या ऑडिओ क्लिपने चांगली जनजागृती झाली. तुम्ही सगळे चांगले काम करा व तालुक्याचे नाव उंचावर न्या, असेही त्यांनी सांगितले.

सभापती गणेश शेळके यांनी या उपक्रमसंदर्भात ग्रामस्थांना माहिती दिली. तालुक्यातील सर्वच गावामध्ये ही मोहीम राबवली जाणार असून, ज्या नागरिकांना कोरोना सदृश्य लक्षणे असतील, त्यांनी त्वरित आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे या वेळी त्यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख