मुख्यमंत्री घरात बसून फेसबुकवरून कारभार पाहतात

वाधवान बंधूंचा बागवान कोण, या प्रश्‍नावर सत्ताधारी मूग गिळून बसले. पाठोपाठ त्यांच्यावर मेहेरबानी करणारे सचिव अमिताभ गुप्ता "क्‍लीन चिट' घेऊन पुन्हा खुर्चीवर बसले.
Radhakrushna Vikhe
Radhakrushna Vikhe

राहाता : कोरोनाचे संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून फेसबुकवरून कारभार पाहतात. मंत्री मुंबईत आणि कोरोनाच्या झळ सोसणाऱ्या सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. वाधवान बंधूंचा बागवान कोण, या प्रश्‍नावर सत्ताधारी मूग गिळून बसले. पाठोपाठ त्यांच्यावर मेहेरबानी करणारे सचिव अमिताभ गुप्ता "क्‍लीन चिट' घेऊन पुन्हा खुर्चीवर बसले, अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

सरकारविरोधात आज विखे पाटील यांनी तहसीलदार कुंदन हिरे यांना निवेदन दिले. नगराध्यक्ष ममता पिपाडा, भाजपचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) राजेंद्र गोंदकर, डॉ. राजेंद्र पिपाडा, बाजार समितीचे सभापती रायभान आहेर, "गणेश'चे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, उपाध्यक्ष प्रताप जगताप, ऍड. रघुनाथ बोठे, पंचायत समितीच्या सभापती नंदा तांबे, रवींद्र कोते, नंदकुमार जेजूरकर आदी उपस्थित होते. 

विखे पाटील म्हणाले, ""रस्त्याने पायी निघालेल्या परप्रांतीय मजुरांना वाहने उपलब्ध करून देण्याचे सौजन्य राज्य सरकारने दाखविले नाही. शेतकऱ्यांकडे पाठ फिरवल्याने शेतमाल कवडीमोल दराने विकण्याची वेळ आली. मंत्री मुंबईत घरी बसून, शेतकऱ्यांचे हाल मख्खपणे पाहत होते. राज्य सरकारने आता केंद्र सरकारच्या पॅकेजवर टीका करीत बसण्याऐवजी स्वतःचे पॅकेज तातडीने जाहीर करावे.'' 

साईबाबा संस्थानने नोकरकपात व त्यांच्या एकूण वेतनात कुठलीही कपात करू नये. साई संस्थानाच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा आहे. हे संस्थान सरकारच्या नियमाने चालते. त्यामुळे अशा संकटकाळात अशी कपात करणे योग्य होणार नाही. राज्य सरकारने सहकारी व खासगी, असा भेद न करता दूधउत्पादकांना सरसकट पाच रुपये लिटर अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणी विखे पाटील यांनी केली. 

महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटाला सर्वांनी समन्वयाने तोंड द्यावे लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा...

भाजप कार्यकर्त्यांकडून राज्य सरकारचा निषेध 

पाथर्डी : कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले. त्यामुळे सरकारचा निषेध करीत असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. 

भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले. नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, अभय आव्हाड, गोकुळ दौंड, रवींद्र वायकर, सोमनाथ खेडकर, नंदकुमार शेळके, अजय रक्ताटे, बंडू बोरुडे, मंगल कोकाटे, माणिक खेडकर, अशोक चोरमले आदी उपस्थित होते.

राजळे म्हणाल्या, की कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांची मोठी हानी झाली. केंद्र सरकारने जनतेला मदत केली. सर्वांसाठी पॅकेज दिले. मात्र, राज्य सरकारने जनतेला काहीच दिले नाही. 22 मे रोजी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता स्वतःच्या घरासमोर आंदोलन करणार आहे. सरकारने सामान्य माणसाला पॅकेज द्यावे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com