कोणाचे मंत्री कुठे फिरतात, हे मुख्यमंत्र्यांनाच माहिती नसते : खासदार विखे पाटील - Chief Minister alone does not know where his ministers go: MP Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

कोणाचे मंत्री कुठे फिरतात, हे मुख्यमंत्र्यांनाच माहिती नसते : खासदार विखे पाटील

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 10 जुलै 2020

विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येवून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली. या  वेळी कोरोनाविषयक आढावा घेतल्यानंतर त्यांनी सरकारवर टीका केली.

नगर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोणाचाच कोणाला मेळ नाही. तिन पक्षाच्या सरकारमधील कोणाचे मंत्री कुठे फिरतात, हे मुख्यमंत्र्यांनाच माहती नसते, असा टोला भाजपचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला लगावला.

विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येवून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली. या  वेळी कोरोनाविषयक आढावा घेतल्यानंतर त्यांनी सरकारवर टीका केली.

ते म्हणाले, राज्य सरकारकडे सध्या पैसे नाहीत. त्यामुळे ते रोज नवीन वेगळे नियम काढतात. मुख्यमंत्री अध्यादेश काढतात. महसूलमंत्री वेगळेच आदेश देतात. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, गावचे सरपंच वेगळेच नियम काढतात. त्यामुळे मंत्री लाॅक आणि जनता अनलाॅक झाली आहे. कोण, कुठे व काय करतो, हेच कोणालाच समजत नाही. नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. जिल्ह्याचा विचार करता केंद्राच्या निधीतून 50 व्हेंटीलेटर मिळणार आहेत. पीपीई कीट दिले जात आहेत. मास्क पुरविले जातात. हाॅस्पिटलसाठी विविध साहित्य देणे हे खर्चिक काम आहे. त्यामुळे राज्य सरकारला थेट आर्थिक साह्य करण्याची गरज काय. सरकार केवळ निधी नाही, असे सांगतात, प्रत्यक्षात केंद्र सरकार मोठी मदत करीत आहे

व्हेंटीलेटर खराब नाहीत

केंद्र सरकारकडून मिळालेले व्हेंटीलेटर सदोष आहेत, असा दावा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी केला होता, याबाबत बोलताना डाॅ. विखे पाटील म्हणाले, मी डाॅक्टर आहे. त्यामुळे मला त्यातील चांगले कळते. त्या नेत्यांनी तसा अहवाल द्यावा. व्हेंटीलेटर सदोष असेल, तर एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला असल्यास तसे कळवावे. असे काहीच झालेले नाही. त्यामुळे असे आरोप बिनबुडाचे आहेत, असा टोला विखे पाटील यांनी लगावला.

दरम्यान, नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, प्रशासकीय पातळीवरून त्याला प्रतिबंधासाठी प्रयत्न होण्याबाबत विखे पाटील यांनी आढावा घेतला. त्याची माहिती घेवून काही सूचना केल्या. कोरोनाबाबत राज्य सरकारकडून व्यवस्थित उपाययोजना होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

 

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख