"कुकडी'चा जोडकालवा फुटला नव्हे, जेसीबी लावून फोडला - The "chicken coop" did not burst, but the JCB burst | Politics Marathi News - Sarkarnama

"कुकडी'चा जोडकालवा फुटला नव्हे, जेसीबी लावून फोडला

संजय आ. काटे
गुरुवार, 4 मार्च 2021

शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी या प्रकाराचा पर्दाफाश केल्यानंतर जलसंपदा विभाग जागा झाला आणि संबंधितांवर कारवाईची भाषा सुरू झाली. 

श्रीगोंदे : "कुकडी'चे आवर्तन अंतिम टप्प्यात असताना तालुक्‍यातील सर्वांत मोठी वितरिका 132चा पोटकालवा काल बुधवारी जेसीबी यंत्र लावून फोडण्यात आला. अधिकाऱ्यांना याचा थांगपत्ता नव्हता. शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी या प्रकाराचा पर्दाफाश केल्यानंतर जलसंपदा विभाग जागा झाला आणि संबंधितांवर कारवाईची भाषा सुरू झाली. 

हेही वाचा... घुलेंच्या शर्य़तीत शेळकेंची एन्ट्री

"कुकडी'चे शेती सिंचनासाठीचे आवर्तन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पिकांकडे दुर्लक्ष करून "कुकडी'च्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी किलोमीटर 132वरील जोडकालवा श्रीगोंदे शिवारात फोडून एका तलावात पाणी सोडले. या अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रशासनाने कारवाई केली नाही, तर अधिवेशन काळात मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा शेतकरी नेते राजेंद्र काकडे यांनी दिला.

लोणी व्यंकनाथ, घारगाव, पारगाव, श्रीगोंदे, बाबुर्डी, शिरसगाव, म्हातारपिंप्री शिवारातील शेतकरी "कुकडी'च्या पाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांना थेट पाणी न देता तलावात पाणी सोडण्याचे उद्योग सुरू आहेत. "कुकडी'चे हे आवर्तन फक्त शेती सिंचनासाठी आहे. कोणत्याही तलावात पाणी सोडू नये, असे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले. मात्र, अधिकाऱ्यांनी या निर्णयाला केराची टोपली दाखविली.

हेही वाचा... त्यांनी घेतला मलिदा

दरम्यान, कालवा फोडण्याचा प्रकार काकडे यांनी सोशल मीडियातून समोर आणल्यानंतर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी अधिकाऱ्यांना याबाबत धारेवर धरले. दरम्यान, काकडे यांनी, याप्रकरणी शेतकऱ्यांना बळीचा बकरा करू नका; यात सामील असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करा, अशी मागणी केली. 

 

हेही वाचा... 

सफाई कर्मचाऱ्यांकडून पंधरा हजार रुपये परत! 

श्रीगोंदे : शहरातील सोनिया गांधी तंत्रनिकेतनमधील सफाई कामगार रूपाली भागवत व सविता उदमले यांना वर्गात 15 हजार रुपये व विविध कार्ड असलेले पाकीट सापडले. त्यांनी हे पाकीट संस्थेच्या कार्यालयात जमा करीत प्रामाणिकपणा जपला. 

शहरातील सोनिया गांधी तंत्रनिकेतनमध्ये आरोग्यसेवक भरती परीक्षा झाली. परीक्षेनंतर वर्गाची सफाई करताना सफाई कर्मचारी भागवत व उदमले यांना पाकीट सापडले. त्यात 15 हजार रुपये, डेबिट, क्रेडिट, आधार, पॅन कार्ड आढळून आले. हे पाकीट त्यांनी प्राचार्य अमोल नागवडे यांच्याकडे सुपूर्द केले. सेनगाव (जि. हिंगोली) तालुक्‍यातील जवळा बुद्रुक येथील गंगाप्रसाद रामभाऊ हनवते याचे ते असल्याचे समोर आले. कुरिअरने हे साहित्य त्याला पाठविण्यात आले. प्रामाणिकपणाबद्दल भागवत व उदमले यांचा महाविद्यालयाने सत्कार केला. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख