गोदाकाठच्या पाणीप्रश्नावर छगन भुजबळ यांनी सुचवला तोडगा - Chhagan Bhujbal suggested a solution to the water issue of Godakath | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

गोदाकाठच्या पाणीप्रश्नावर छगन भुजबळ यांनी सुचवला तोडगा

मनोज जोशी
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. कोरोनामुळे आर्थिक उलाढाल मंदावली. केंद्राकडे जीएसटीचे 30 हजार कोटी अडकले.

कोपरगाव : सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या व गुजरातकडे समुद्राला वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्यावर राज्याचा हक्क आहे. हे सुमारे 125 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविले, तर भविष्यात पाण्यासाठी होणारी जिल्ह्या-जिल्ह्यातील भांडणे मिटतील, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

शहरातील कृष्णाई मंगल कार्यालायात गोदावरी डावा तट कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मंत्री भुजबळ बोलत होते. आमदार आशुतोष काळे, मुख्य अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे आदी उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी चालू हंगामात रब्बीचे एक व उन्हाळी दोन, अशी तीन आवर्तने देणार असल्याचे या वेळी जाहीर केले. 

मंत्री भुजबळ म्हणाले, ""राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. कोरोनामुळे आर्थिक उलाढाल मंदावली. केंद्राकडे जीएसटीचे 30 हजार कोटी अडकले. महात्मा फुले योजना, तसेच विदर्भ, सोलापूर, लातूर भागातील महापुरामुळे मोठे नुकसान झाले. त्याच्या भरपाईवर कोट्यवधी रुपये खर्च झाले. कोरोना काळात सरकारने आरोग्यसुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले. गोरगरिबांना मुबलक अन्नधान्य पुरवठा केला. चालू वर्षी धरण परिसरात कमी पाऊस झाला असून, पाण्याचे बाष्पीभवन, गळती व अन्य कारणांनी पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तीन आवर्तने सोडण्याच्या निर्णयाला सहमती दर्शविली.'' 

आमदार आशुतोष काळे म्हणाले, की गोदावरी खोऱ्याचा पाणीप्रश्न बिकट होत असून, पश्‍चिमेकडे जाणारे पाणी वळविणे किती गरजेचे आहे, हे आता लक्षात येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी विशेष लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा. आवर्तन सोडण्याआधी चाऱ्यांची दुरूस्ती करावी. 

परजणे म्हणाले, की समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे आमच्यावर अन्याय झाला. एक तर हा कायदा संपूर्ण राज्यात लागू करावा किंवा रद्द करा. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, कारभारी आगवान, अशोक खांबेकर, एम. टी. रोहमारे यांच्यासह शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. 

दरम्यान, गोदावरीचे पाणी कोणाच्या वाट्याचे, याबाबत गेल्या काही वर्षांपासून नगर व औरंगाबाद जिल्ह्यातही वाद होते. गोदावरी काठच्या जिल्ह्यांमध्ये या वादाचे पडसाद पडत होते. नगर जिल्हा या पाण्यावर हक्क सांगतो, तर अतिरिक्त पाण्यावर इतर जिल्हे हक्क सांगतात. असे असताना कोकणात जाणारे पाणी या पात्रात सोडले, तर हे वाद कायमस्वरुपी मिटतील, असा सल्ला मंत्री भुजबळ यांनी दिला. याच प्रश्नांसाठी गेले अनेक वर्ष राजकीय नेत्यांमध्ये जुगलबंदी सुरू आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख