चंडीगडच्या तृतीयपंथीयांचे दातृत्व, साईबाबांच्या झोळीत 11 लाखांचे दान - Charity of third parties in Chandigarh, donation of Rs 11 lakh in Sai Baba's pocket | Politics Marathi News - Sarkarnama

चंडीगडच्या तृतीयपंथीयांचे दातृत्व, साईबाबांच्या झोळीत 11 लाखांचे दान

सतीश वैजापूरकर
बुधवार, 30 डिसेंबर 2020

साईसंस्थानच्या अधिकाऱ्यांनी सामान्य ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांनी एरवी वर्षानुवर्षे सहज मिळणारे साईसमाधीचे दर्शन कोविडचे कारण दाखवून अवघड केले.

शिर्डी : चंडीगढ येथील तृतीयपंथी (किन्नर) समाजबांधवांच्या मेळ्याने काल साईबाबांच्या झोळीत तब्बल 11 लाखांचे दान टाकले. त्या बदल्यात साईसंस्थानने देऊ केलेली मोफत व्हीआयपी साईदर्शनाची सुविधाही नम्रपणे नाकारली. दर्शनबारीतील रांगेत उभे राहूनच त्यांनी साईसमाधीवर आपला माथा टेकविणे पसंत केले. 

किन्नर समाज दान मागून चरितार्थ चालवितात. साईबाबांच्या दरबारात मात्र आज नेमके उलटे चित्र पाहायला मिळाले. या समाजबांधवांनी बाबांच्या झोळीत भरभरून दान टाकले. बाबांच्या झोळीत जमा झालेले दान भाविकांच्या सुविधेऐवजी अन्यत्र खर्च करण्यात धन्यता मानणाऱ्यांना किन्नर बांधवांच्या दातृत्वाने चपराक दिली. दानपेटीत जमा होणारी दक्षिणा सामान्य भाविकांच्या सुविधांसाठी खर्च करा, असा संदेश त्यांनी यानिमित्ताने दिला. 

व्हीआयपी दर्शनावरून साईमंदिर दररोज मानापमान नाट्य रंगते. बाबांच्या झोळीत दान टाकणारे भाविक दर्शनपास मिळविण्यासाठी ठिकठिकाणी रांगा लावून तिष्ठत उभे असतात. त्यावेळी अधिकारी मंडळी, तथाकथीत व्हीआयपी मंडळी बाबांच्या दरबारात येऊन नाराज होणार नाही. त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागणार नाही, यासाठी फार काळजी घेतात. 

साईसंस्थानच्या अधिकाऱ्यांनी सामान्य ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांनी एरवी वर्षानुवर्षे सहज मिळणारे साईसमाधीचे दर्शन कोविडचे कारण दाखवून अवघड केले. दररोज वाद नको, या कारणास्तव पंचक्रोशीतील भाविक साईमंदिराच्या कळसाचे दर्शन घेणे पसंत करतात. अधिकाऱ्यांना त्याचे काही वाटत नाही. 

काल साईदर्शनासाठी आलेल्या 10 किन्नरांच्या मेळ्याने देणगी दिली, या एकमेव कारणास्तव साईसंस्थान प्रशासनाने देऊ केलेली व्हीआयपी दर्शन सुविधा त्यांनी नम्रपणे नाकारली. त्यामुळे साईदर्शन अवघड करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणखी एक धक्का बसला. 

साईदर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर येतात. साईदर्शनानंतर मंदिर परिसरातील कक्षात पत्रकारांसमवेत संवाद साधतात. त्यातून साईसंस्थान व शिर्डीच्या समस्यांबाबत चर्चा होते. येथील समस्या सोडविण्यासाठी मंत्री व उच्चपदस्थ अधिकारी त्यातून पुढाकार घेतात, ही आजवरची परंपरा कोविडचे कारण देऊन खंडीत करण्यात आली. आता कुणीही उच्चपदस्थ दर्शनासाठी आला की दर्शन व्यवस्था उत्तम होती, अशा एकाच आशयाचे निवेदन संस्थानतर्फे प्रसिद्धीस दिले जाते. आज या किन्नरांच्या मेळ्यानेदेखील दर्शन व्यवस्था उत्तम आहे, असे संस्थानच्या अधिकाऱ्यांना सांगितले. अशा आशयाचे निवेदन देण्यात धन्यता मानली. बाबांचा महिमा महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभर असल्याने हजारो भाविकांपुढे हे दान आदर्श ठरणार आहे.

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख