Change lifestyle to control pollution | Sarkarnama

प्रदूषण नियंत्रणासाठी बदलावी `लाईफ स्टाईल`

डाॅ. बाळ ज. बोठे पाटील
रविवार, 7 जून 2020

लोकांचा प्राधान्यक्रम बदलला. जगायचं कसं, याचेच धडे लोकांना मिळाले. कलुषित विचारांनी दूषित झालेली मने सुधारली. प्रदूषण कमी करण्याचे "प्रॅक्‍टिकल'च निसर्गाने दाखवून दिले.

नगर : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउन झाला. जगभरातीलही काही देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन तेथेही लॉकडाउन करण्याची वेळ आली. एकाच वेळी लॉकडाउन झाल्याने प्रदूषण कमी झाले. वायुप्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण एवढेच नव्हे, तर अनेकांच्या मनातील प्रदूषण कमी होण्यास कोरोना कारणीभूत ठरला.

लोकांचा प्राधान्यक्रम बदलला. जगायचं कसं, याचेच धडे लोकांना मिळाले. कलुषित विचारांनी दूषित झालेली मने सुधारली. प्रदूषण कमी करण्याचे "प्रॅक्‍टिकल'च निसर्गाने दाखवून दिले. आगामी काळात याच पद्धतीने "लाइफ स्टाइल'मध्ये बदल करीत सुंदर जीवन कसे जगता येईल, याचाच समाजाला विचार करावा लागेल. आदर्श गाव हिवरेबाजारने नव्याने ठराव केला. वर्षातून किमान दहा दिवस तरी ते गाव लॉकडाउन करणार आहेत. त्याचा फायदा गावाला होईल. याचाच कित्ता इतर गावांनी गिरविण्याची गरज आहे. 

जलप्रदूषण रोखण्यासाठी हव्यात उपाययोजना 

नगर जिल्ह्यातील जलप्रदूषणाबाबत अनेकदा आराखडे तयार झाले; परंतु त्यावर ठोस उपाययोजना होऊ शकल्या नाहीत. नगर शहरातील सांडपाण्याचा प्रकल्प रखडल्याने सीना नदीचे प्रदूषण झाले. त्यामुळे साहजिकच नदीकाठची गावे प्रदूषित झाली. तेथून मिळणारा भाजीपाला आता कोणी घेण्यास तयार नाही. शेतीचे नुकसान झाले. या व्यतिरिक्त लोकांकडून झालेला प्लॅस्टिकचा वापर विपरीत परिणाम करणारा ठरला. प्लॅस्टिकबंदी असली, तरीही अजूनही अनधिकृतपणे प्लॅस्टिकचा वापर होतो, हे कचऱ्यावरून दिसून येते. याबरोबरच प्रत्येक तालुक्‍यातील शहराच्या गावांमधील सांडपाण्याची व्यवस्था सुधारून प्रदूषण कमी करता येईल. कोरोनामुळे चांगले आरोग्य ठेवणे सक्तीचे झाले. प्रत्येकाला आता स्वतःचे आरोग्य चांगलेच असावे, असे वाटते. जलप्रदूषणातून होणारे आजार टाळण्यासाठी आता प्रत्येक जण पुढे येईल. त्यामुळे हीच संधी आहे. लोकांमध्ये प्रबोधन होऊन पाणी खराब होणार नाही, याचा प्रयत्न होऊ शकेल. त्यासाठी ठोस उपाययोजना होण्याची गरज आहे. 

ध्वनिप्रदूषणाला ब्रेक लावण्यासाठी हवी नियमावली 

सर्वच मोठ्या शहरांत ध्वनिप्रदूषणाने लोक हतबल झाले होते. अनेकांना कानांचे आजार झाले. रस्त्यावरून प्रवास करताना वाजणारे हॉर्न डोकेदुखी ठरत होते. धार्मिक स्थळांचे भोंगे परिसरातील नागरिकांची झोप उडवत होते. पशू-पक्ष्यांचा सुंदर स्वर केव्हाच हरवून गेला होता. आता लॉकडाउनमुळे हे सर्व थांबले. लोकांना पक्ष्यांचे मधुर स्वर ऐकू येऊ लागले. मानसिक स्वास्थ्य ठीक राहण्यासाठी ध्वनिप्रदूषण कमी होणे आवश्‍यक आहे. आगामी काळात त्याचे नियोजन होणे शक्‍य आहे. रस्त्यावरील हॉर्न वाजविण्याची पद्धत बदलली पाहिजे. मुळात हॉर्नचा आवाज किती असावा, याबाबत कंपन्यांना बंधने घालणे आवश्‍यक आहे. धार्मिक स्थळावरील भोंगे वाजविण्याच्या वेळा निश्‍चित करून द्याव्यात. रस्त्यावरून निघणाऱ्या लग्नाच्या किंवा इतर मिरवणुकांना नियमावली करायला हवी. डीजेचा दणका बंदच करायला हवा. मोठ्या आवाजात गाण्याच्या तालावर नाचणाऱ्यांवर बंधने हवीत. गणेशोत्सवासारखे सर्वच धर्मियांच्या मिरवणुका कमी आवाजात कशा निघतील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनाने दाखवून दिले, की ध्वनिप्रदूषणापासून मुक्तता मिळविणे शक्‍य आहे. त्यातून काही शिकवण घेऊन पुढील वाटचाल करणे आवश्‍यक आहे. 

वायुप्रदूषण आटोक्‍यात येऊ शकते 

कोरोनाच्या काळात गेल्या दोन महिन्यांपासून वायुप्रदूषण कमी झाले. सर्वच कंपन्यांच्या चिमण्यांची धुराडे बंद होती. रस्त्यावरील वाहनांचा धूर नव्हता. त्यामुळे शहरातील प्रदूषण एकदम कमी झाले. हीच स्थिती जागतिक पातळीवर होती. त्यामुळे ओझोनच्या थरावर परिणाम झाला होता. जागतिक तापमान कमी होण्यास त्यानिमित्ताने मदत झाली. जागतिक स्तरावर आपण वायुप्रदूषण कमी करू शकतो, हे कोरोनाने दाखवून दिले. एकाच वेळी लॉकडाउनचा पर्याय तसा कोणाला सुचला नसता. वर्षातील ठरावीक दिवस जर लॉकडाउन करता आले, तर संपूर्ण ध्वनिप्रदूषण नियंत्रणात करणे शक्‍य आहे. तज्ज्ञांच्या मते प्रत्येक आठवड्यातील किमान एक दिवस तरी वाहने रस्त्यावर फिरणार नाहीत, कंपन्यांचे धुराडे शांत राहतील, अशी व्यवस्था व्हायला हवी. त्यामुळे वायुप्रदूषण नियंत्रणात आणणे शक्‍य आहे. याबरोबरच प्रत्येक नागरिकाने अनावश्‍यक गाड्या फिरवू नये. शक्‍य असेल तेवढे कामे घरातून केली, तरी चालतात, हे लॉकडाउनमुळे लक्षात आले. सायकलचा वापर व्हावा, जवळची कामे पायी चालूनसुद्धा होऊ शकतात. त्यासाठी वेळ काढणे आवश्‍यक आहे. एकूणच प्रत्येकाने ठरविले, तर प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. प्रदूषण आटोक्‍यात येऊ शकते, त्यासाठी राजकीय मानसिकता हवी आहे. 

मनाचे प्रदूषण कमी होणे शक्‍य 

लॉकडाउनमुळे जगण्याची पद्धती बदलतीय. त्यामुळे अनेक व्याधी दूर झाल्या. पैसा साठवून ठेवण्याऐवजी तो वापरून आनंद घेण्याची मानसिकता वाढणार आहे. शरीराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शुद्ध खाणे लोकांनी पसंत केले. त्यामुळे अनावश्‍यक हॉटेलिंग टळणार आहे. साहजिकच शारीरिक आरोग्य चांगले झाल्यानंतर मनाचे आरोग्यही सुधारणार आहे. पैसा वाढविण्यापेक्षा तो जपून वापरण्याची प्रवृत्ती बळावत आहे. त्याचा परिणाम प्रत्येकाची मानसिकता सुधारण्यात होईल. संकटाच्या काळात इतरांनी मदत करण्यापेक्षा स्वतःचा बचाव स्वतःच कसा करता येईल, ही वृत्ती बळावली. अंधश्रद्धेचे भूत काहीसे पळाले आहे. अडचणीच्या प्रसंगी माणूसच माणसाला मदत करू शकतो, हेही कोरोनामुळे कळाले आहे. एकूणच बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेत आगामी काळात प्रशासनाने नियोजन करणे उचित ठरणार आहे. लोकांचे मानसिक स्वास्थ्य ठीक राहण्यासाठी उपाययोजना होण्याची गरज आहे. प्रत्येकाला दोन वेळचे जेवण व्यवस्थित मिळेल, रोजगार उपलब्धी, अन्न, वस्त्र, निवारा या गरजांची पूर्तता या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी आवश्‍यक नियोजन करणे अत्यावश्‍यक ठरणार आहे. 

निसर्गाशी जुळवून घ्यावे 

लॉकडाउनच्या काळात निसर्गाचे महत्त्व बहुतेकांना कळाले आहे. आयुर्वेदावर भर देत लोक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी याच उपचारपद्धतीचा वापर करू लागले आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याला प्राधान्यक्रम मिळत असून, सेंद्रिय शेतीचा उच्चार होत आहे. त्यामुळे आगामी काळात निसर्गाशी लोकांची जवळीक वाढविण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. त्यासाठीच शासकीय पातळीवर उपाययोजनांची गरज आहे. शेती, वने, वन्य प्राणी, पशू-पक्षी यांची जपणूक करण्यासाठी देशपातळीवर खास आदेश देण्याची गरज आहे. एकूणच निसर्गाशी जुळवून घेतल्यानंतर माणूस अधिक कार्यक्षम होऊ शकेल, हे निश्‍चित! 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख