साईसंस्थानच्या लाडुचे प्रमाणीकरण, वाढणार पाैष्टिकता - Certification of Sai Sansthan's Laddu, Increased Pasteurism | Politics Marathi News - Sarkarnama

साईसंस्थानच्या लाडुचे प्रमाणीकरण, वाढणार पाैष्टिकता

सतीश वैजापूरकर
सोमवार, 29 मार्च 2021

साईसंस्थानने बुंदीचे लाडू तयार करण्याच्या पद्धतीचे प्रमाणीकरण केले. त्यातून साजूक तुपाची चाळीस टक्‍क्‍यांपर्यंत बचत होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.

शिर्डी : साईसंस्थानने बुंदीचे लाडू तयार करण्याच्या पद्धतीचे प्रमाणीकरण केले. त्यातून साजूक तुपाची चाळीस टक्‍क्‍यांपर्यंत बचत होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.

साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी तिरुपती देवस्थान येथील बुंदी लाडू तयार करण्याची पद्धत पाहून त्यात काही बदल करून हे प्रमाणीकरण करण्यात आले. साईसंस्थानला दरवर्षी 28 कोटी रुपये किमतीचे साजूक तूप खरेदी करावे लागते. हे लक्षात घेतले, तर या नव्या प्रमाणीकरणातून तुपाच्या खर्चात मोठी बचत शक्‍य होऊ शकेल. 

साईसंस्थानकडून सध्या दररोज आठ ते दहा हजार लाडू पाकिटांची विक्री होते. भाविकांची संख्या कमी झाल्याने सात ते आठ हजार लाडू प्रसाद स्वरूपात मोफत दिले जातात. आजवर बुंदीचे लाडू तयार करताना एक क्विंटल साखर, 72 किलो साजूक तुप व 65 किलो बेसनपीठ, असे ढोबळ मानाने प्रमाण वापरले जात होते. प्रमाणीकरणानंतर तूप वापराचे प्रमाण सोळा किलोंनी कमी झाल्याचे आढळून आले. 

याबाबत बगाटे म्हणाले, ""परंपरागत पद्धतीने लाडू तयार करताना चाळीस टक्के तूप भट्टीवर जळून जात होते, तर वीस टक्के तूप जळून काळे पडत होते. लाडू प्रमाणीकरणानंतर सुरवातीलाच तुपाची चाळीस टक्के बचत होत असल्याचे निदर्शनास आले. त्यात पुढे सुधारणा झाली, तर तुपाचा वापर आणखी कमी होऊ शकेल. त्यामुळे काजू, बदाम, मगज बी, बेदाणे व विलायचीचे प्रमाण वाढविले, तर लाडू अधिक पौष्टिक होवून त्यांचा स्वादही वाढेल.''

आगामी काळात देश-विदेशातील भाविकांना हा नव्या स्वादाचा लाडू प्रसाद स्वरूपात मिळू शकेल, अशी आशा करायला हरकत नाही. दरम्यान, साईबाबांच्या दर्शनाला महाराष्ट्रातूनच नव्हे, तर जगभरातून लोक येतात. त्यांना या प्रसादाचा लाभ मिळत असतो.

प्रसाद सांडण्याचे प्रमाण कमी

पूर्वी दर्शनार्थी भाविकांना प्रसाद स्वरूपात बुंदीचे पाकीट दिले जायचे. अनेक वेळा ही बुंदी सांडत असे. आता पाकीट बंद लाडू दिला जात आहेत. भाविकांना तो व्यवस्थित खाता येतो किंवा घरी नेता येतो. त्यामुळे प्रसाद सांडण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असे साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सांगितले.

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख