महसूल विभागाला आयुक्त गमे यांच्याकडून चांगल्या कामाचे `सर्टिफिकेट` - Certificate of good work from Commissioner Game to Revenue Department | Politics Marathi News - Sarkarnama

महसूल विभागाला आयुक्त गमे यांच्याकडून चांगल्या कामाचे `सर्टिफिकेट`

मुरलीधर कराळे
बुधवार, 9 डिसेंबर 2020

राज्य सरकारने जिल्ह्यास ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपैकी किती उद्दिष्ट साध्य झाले आहे, कोणत्या योजनेच्या अंमलबजावणीत कमतरता आहे आणि ती कमतरता का राहिली, याबाबत प्रत्येक यंत्रणेने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

नगर : महसूल विभागाचे जिल्ह्यातील कामकाज समाधानकारक असल्याचे सांगून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकाऱ्यांना ही कामे अधिक गतीमान करण्याच्या सूचना दिल्या. महसूलाबाबत वसुलीचे लक्ष्य वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सध्या जिल्ह्यात प्रशासनाकडून चांगले काम आहेत. हे अधिक गतिमान करावे, नागरिकांना शासनाच्या विविध सोईसुविधा आणि योजनांचा लाभ वेळेवर मिळावा, यासाठी महसूल यंत्रणेने महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी वेळेवर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची गतिमान अंमलबजावणी आणि प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात विभागीय आयुक्त गमे यांनी महसूल विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित तसेच अधिकारी या वेळी उपस्थित होते.

गमे म्हणाले, की राज्य सरकारने जिल्ह्यास ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपैकी किती उद्दिष्ट साध्य झाले आहे, कोणत्या योजनेच्या अंमलबजावणीत कमतरता आहे आणि ती कमतरता का राहिली, याबाबत प्रत्येक यंत्रणेने कार्यवाही करणे अपेक्षित आहे. योजना अंमलबजावणीत प्रलंबितता असता कामा नये, नागरिकांच्या सोईसुविधांशी संबंधित योजनांचा लाभ त्यांना तात्काळ मिळाला पाहिजे. अभियानाच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यातील शासकीय जमीन महसूल व गौणखनिज वसूली, त्यासाठी दिलेले उद्दिष्ट्य आणि झालेली उद्दिष्ट्यपूर्ती याबाबत त्यांनी ग्रामस्तरावर सर्व तलाठ्यांना कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यास सांगितले. गौणखनिज उत्खननाचे जिल्ह्यासाठी १३८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. विहित मुदतीत उद्दिष्ट्यपूर्ती करण्याच्या सूचना गमे यांनी दिल्या. वाळू लिलाव, दगडखाणीच्या संदर्भाक सद्यस्थिती आदीची माहिती त्यांनी घेतली.

सर्व अधिकारी यांनी अधिकाधिक सकारात्मतेने काम करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या वेळी त्यांनी राज्य लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत प्राप्त अर्जाची संख्या, विहित कालावधीत त्यावर कार्यवाही झाली आहे का, प्रलंबितता आदींची माहिती घेतली. ई-फेरफार संदर्भातील आज्ञावलीची १०० टक्के अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते या वेळी जिल्हाधिकारी यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या नगरनिवास या इमारतीची माहिती देणार्‍या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. ही पुस्तिका महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यापेक्षा चांगली झाली असल्याचे या वेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख