अकोले : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी विधेयकाचा फायदा आदिवासी शेतकरी घेत असून, `विकेल ते पिकेल` या धोरणानुसार या भागातील शेतकऱ्यांनी जांभळा भात पिकवित आहेत. स्वतः विविध प्रदर्शनात तांदूळ विकत आहे, असे प्रतिपादन भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी केले.
पिचड यांनी आयोजित केलेल्या अकोले तालुक्यातील शिरपुंजे, धामणवन या भागातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी आयोजित शेतीशाळामध्ये `भात नर्सरी लागवड ते काढणी पश्चात विक्री व्यवस्था` याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, तालुका कृषीअधिकारी प्रवीण गोसावी तसेच इतर अधिकारी व प्रगतशील शेतकरी गंगाराम धिंदळे, शेतीतज्ज्ञ रमाकांत डेरे तसेच शेतकरी उपस्थित होते.
पिचड म्हणाले, की जांभळा भित पिकविल्याने गंगाराम धिंदळे हे गंगारामसेठ धिंदळे झाले आहेत. जांभळ्या भातातील औषधी गुणधर्माचा उपयोग आजारी माणसांना होईल, या भातामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होणार आहे, त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी व आपला शेतीमाल स्वतः विकून फायदा मिळवावा, असे आवाहन पिचड यांनी केले.
जगताप म्हणाले, की आदिवासी भागात सेंद्रिय शेतीचे गट असून, त्यामध्ये जांभळ्या भाताची चांगली उत्पादकता मिळत आहे. हा जांभळा भात हा औषधी गुणधर्म असेलला तांदूळ असून, त्यामध्ये न्यूट्रिशीयन्स व्हॅल्यू जास्त आहेत. त्यामध्ये मिनरल्स, व्हिटॅमिन्स व अँटी ऑक्सिडेंटस असून, व्याधीग्रस्त व्यक्तीला याचा फायदा झालेला आहे. या भाताचा बाजारभाव 300 ते 400 रुपये किलो मिळत आहे. या भाताचे ब्रँडिंग करून स्थापन केलेल्या साई ऑरगॅनिक या सेंद्रिय गटाद्वारे हा भात विकणार आहोत. अकोले तालुक्यातील जांभळा- निळा भात राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचविणार आहे, त्यामुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी आता `विकेल ते पिकेल` या धोरणानुसार जांभळ्या भात पिकाचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली. त्यामध्ये काळी मिरी लागवड, चारोळी लागवड, नवापूरची तूर, बांधावर फणस लागवड याची माहिती देऊन फळलागवडीसाठी प्रोत्साहित केले व कृषी विभाग सर्व मदत व मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले.
या मार्गदर्शनामध्ये आदिवासी शेतकऱ्यांनी प्रश्न विचारून या भात शेतीची माहिती करून घेतली.
दरम्यान, आदिवासी भागात पिकविलेला हा भात महाराष्ट्रात विविध ठिकाणी पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Edited By - Murlidhar Karale

