नगर : उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील पिडित कुटुंबियांकडे काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना जाऊ न देता योगी आदित्यनाथ सरकारने अटक केली. पोलिसांनी त्यांची काॅलर धरून त्यांना मागे खेचले, हे कृत्य राजकीय नेत्याच्या आशीर्वादाशिवाय होणार नाही. भाजप सरकारने वाईट पद्धतीने राजकाराला दिशा देण्याचा हा परिणाम आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी या घटनेचा निषेध केला.
देशमुख यांनी म्हटले आहे, की भाजपने अशा घटनेच्या यानिमित्ताने देशाच्या राजकीय संस्कृतीला घातक वळण लावले. नेत्यांची काॅलर पकडने, हे यापूर्वी आपल्या देशात घडले नव्हते. भाजपने वाईट पद्धतीने राजकारणाला दिशा दिली. राष्ट्रीय नेत्याची काॅलर पकडणे, हे शोभत नाही. राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याशिवाय कोणताही पोलिस अशा पद्धतीचे कृत्य करणार नाही.
गांधी, नेहरू घराण्यावर उत्तरप्रदेशमधील जनतेने अपार प्रेम केले आहे. त्यांच्या घरातील राष्ट्रीय नेत्यांची काॅलर धरणे हे पोलिसांना शोभत नाही. नराधामांकडून अत्याचार होण्याच्या घटना उत्तर प्रदेश सरकारला नवीन नाहीत. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्याच वेळी असा घटनांबाबतीत कठोर पावले उचलली असती, तर ही मुलगी बळी पडली नसती.
कोणत्याही नेत्यांना अशा पद्धतीने अटक करणे, हे पोलिसांना शोभत नाही. पोलिस प्रशासनावर भाजप सरकारचा वचक नसून उलट त्यांना वरदहस्त दिसतो. त्यामुळेच पोलिस अधिकारी अशा पद्धतीचे कृत्य करतात. हे समाजाच्या दृष्टीने घातक आहे, असेही देशमुख म्हणाले.

