शिर्डी विमानतळावरून कार्गो वाहतूक ! लवकरच "नाईट लॅंडीग'ही सुरू होण्याची शक्‍यता - Cargo transport from Shirdi Airport! "Night Landing" is expected to begin soon | Politics Marathi News - Sarkarnama

शिर्डी विमानतळावरून कार्गो वाहतूक ! लवकरच "नाईट लॅंडीग'ही सुरू होण्याची शक्‍यता

अरुण गव्हाणे
मंगळवार, 23 मार्च 2021

शिर्डी विमानतळावरील "नाईट लॅंडिंग'चे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. त्यास तांत्रिक मंजुरी मिळण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने नागरी उड्डाण संचालनालयाकडे (डीजीसीए) पाठविला आहे.

पोहेगाव : शिर्डी विमानतळावरून प्रवाशांसह कार्गो वाहतुकीसाठीही नागरी उड्डयन सुरक्षा ब्यूरो कार्यालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच शिर्डी विमानतळावरून कार्गो वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे स्थानिक मालास व वाहतुकीस चालना मिळेल. हवाई वाहतुकीमुळे वेळेची बचत होईल. लवकरच शिर्डी विमानतळ मर्यादित मालवाहतूक सेवा सुरू करणार असून, त्यासाठी आवश्‍यक उपकरणे बसविण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी दिली. 

हेही वाचा...  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा

शिर्डी विमानतळ प्रशासनाने कार्गो वाहतुकीसाठी नागरी उड्डयन सुरक्षा ब्यूरोकडे परवानगी मागितली होती. त्यांच्या परवानगीचे पत्र नुकतेच शिर्डी विमानतळ प्रशासनास मिळाले. सध्या प्रवाशी वाहतूक करणाऱ्या विमानांतूनच मालवाहतूक होणार आहे. त्यास मिळणाऱ्या प्रतिसादावर पुढील निर्णय होणार आहे. येथून मालवाहतूक सुरू झाल्यास काकडीसह परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. 

शिर्डी विमानतळावरील "नाईट लॅंडिंग'चे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. त्यास तांत्रिक मंजुरी मिळण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने नागरी उड्डाण संचालनालयाकडे (डीजीसीए) पाठविला आहे. त्यांचे पथक लवकरच काकडीत येऊन कामाची पाहणी करणार आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर येथे रात्रीची विमानसेवा सुरू होणार आहे. येत्या दीड महिन्यात मंजुरी मिळून येथे ही सेवा सुरू होऊ शकते. रन-वे, दिवे व इतर आवश्‍यक सुविधांची कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दीपक शास्त्री यांनी दिली. 

हेही वाचा... निष्ठेचे फळ मिळते का

"गो-एअर'ची सेवा सुरू होणार 

दरम्यान, सध्या "इंडिगो' आणि "स्पाईस जेट' या कंपन्या येथे विमानसेवा देत आहेत. सध्या रोज 10 विमाने येथून ये-जा करतात. आता 27 तारखेपासून "गो-एअर' कंपनी येथून विमानसेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी डीजीसीए व महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. त्यांची परवानगी मिळाल्यावर दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, मुंबई व चेन्नईसाठी येथून विमानसेवा सुरू करणार आहेत. त्यामुळे येथून तीन कंपन्यांची 15 विमाने ये-जा करतील. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख