निरोगी जीवनासाठी मंत्री थोरातांच्या मतदारसंघात हे अभियान सुरू होणार - The campaign will start in the constituency of Minister Thorat for a healthy life | Politics Marathi News - Sarkarnama

निरोगी जीवनासाठी मंत्री थोरातांच्या मतदारसंघात हे अभियान सुरू होणार

आनंद गायकवाड
बुधवार, 16 जून 2021

आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतलेल्या या लोकचळवळीत तालुक्यातील नागरिक व सहकारी संस्थांचा मोठा वाटा आहे.

संगमनेर : कोरोना महामारीच्या काळात प्राणवायूचे महत्व अधोरेखित झाले आहे. सुखकर व निरोगी मानवी जीवनासाठी वृक्षसंवर्धन व पर्यावरणाला अनन्यसाधारण महत्व आहे. दिवंगत भाऊसाहेब थोरात (Bhausaheb Thorat) यांनी अत्यंत दूरदृष्टीतून आकाराला आणलेली दंडकारण्याची चळवळ लोकसहभागामुळे लोकचळवळ झाली आहे. या वर्षी 1 जुलै पासून दंडकारण्य अभियानाचा प्रारंभ होत असल्याचे सूतोवाच राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. (The campaign will start in the constituency of Minister Thorat for a healthy life)

जयहिंद लोकचळवळ, अमृत उद्योग समूहातील सर्व संस्था, सर्व सेवाभावी संस्था, विविध शासकीय विभाग, शाळा व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोळाव्या दंडकारण्य अभियानाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे होते.

ते म्हणाले, की आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतलेल्या या लोकचळवळीत तालुक्यातील नागरिक व सहकारी संस्थांचा मोठा वाटा आहे. मानवी चुकांमुळे ग्लोबल वार्मिंग, प्रदूषण, वादळे, दुष्काळ अशा अनेक नैसर्गिक संकटांचा सामना मानवजातीला करावा लागला. तालुक्यातील दंडकारण्याची चळवळ यावर प्रभावी उपाय आहे. या अंतर्गत तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुतर्फा, गावोगावी मोकळ्या जागेत, डोंगर व गायरानावर विविध वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून, शेतांच्या कडेलाही नारळ, लिंबू, जांभूळ, शेवगा, आंबा, चिंच आदी बहुपयोगी वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. तसेच चंदनापुरी, कऱ्हे व माहुली या घाटांमध्ये विविध फुलझाडे लावण्यात येणार आहेत. या वर्षीच्या दंडकारण्य अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

या वेळी होते. प्रकल्प प्रमुख दुर्गा तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, शिवाजीराव थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.
 

हेही वाचा...

छात्रभारती संघटनेचे आंदोलन

संगमनेर : जनतेला दारु पाजण्याची जबाबदारी स्विकारीत सरकार दारुची बंद दुकाने सुरु करीत आहे. मात्र शिक्षणाची जबाबदारी घ्यायला तयार नाही. मोफत शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे सांगत छात्रभारती संघटनेने संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवलेल्या निवेदनात कोरोना काळात शिक्षणाची सर्वस्वी जबाबदारी सरकारने स्लिकारून विद्यार्थ्यांची लुट थांबवायला हवी. कोरोना महामारीत शाळा, महाविद्यालये ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. या दरम्यान लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. कित्येक कुटूंबे रस्त्यावर आली असून, अनेकांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

आर्थिक डोलारा ढासळला आहे. मात्र या काळात ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क पूर्ण वसूल केले जात आहे. सरकार व संस्थाचालक संगनमताने विद्यार्थ्यांची फसवणूक करून लूट करीत आहेत. परंतु सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहात नाही.

अनेक विद्यार्थी मोबाईल रिचार्ज करण्यासाठी पैसे नसल्याने ऑनलाईन शिक्षणापासून वंचित रहात असल्याने, अशा विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षणासाठी वर्षभरासाठीचा 1 हजार 500 रुपये रिचार्जसाठी उपलब्ध करून द्यावे. शिक्षणाचे बाजारीकरण व भांडवलशाही थांबवून सरकारने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्काला न्याय देण्याची मागणी केली असून, याची अंमलबजावणी न झाल्यास छात्रभारती संघटनेच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 

हेही वाचा..

मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाकडून दिशाभूल

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख