नगर : आजारपणाच्या काळातील पगार काढून देण्यासाठी आरोग्य सहाय्यकाकडून 80 हजारांची लाच घेताना जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. रजनी रामदास खुणे (वय 57) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. सेवानिवृत्ती जवळ आली असताना झालेला हा `प्रताप` डाॅ. खुणे यांच्या नोकरीला काळीमा फासणारा ठरला.
प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक आहेत. सप्टेंबर 2014 ते जानेवारी 2015 या कालावधीत ते आजारपणाच्या रजेवर होते. रजेच्या काळातील वेतन त्यांना मिळाले नाही. त्यांनी त्यासाठी 2019 मध्ये डाॅ. खुणे यांच्याकडे अर्ज केला होता. खुणे यांनी त्यांचे वेतन 1 लाख 39 हजार मिळवून दिले. हे काम केले म्हणून डाॅ. खुणे यांनी संबंधित कर्मचाऱ्याकडे या रकमेच्या सुमारे 80 टक्के म्हणजे 84 हजार रुपयांची मागणी केली.
एव्हढी मोठी रक्कम द्यावयाची असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून सापळा लावला. त्यानुसार 26 नोव्हेंबर रोजी लाच स्विकारताना डाॅ. खुणे यांना पकडण्यात आले. पंचासमक्ष 80 हजार रुपये स्विकारताना पकडल्याने ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा लावण्यात आला.
धुळे येथून आणलेले गावठी कट्टे पकडले
धुळे येथून नगरमध्ये विक्रीसाठी आणलेले गावठी कट्टे व जिवंत काडतुशे घेऊन येणाऱ्या दोघांना आज स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने पकडले. चुन्नीलाल सुभाराम पावरा (रा. हिवरखेडा, जि. धुळे) व दिलीप जयसिंग पावरा (रा. आंबा, जि. धुळे) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 60 हजार 400 रुपये किमतीचे देशी बनावटीचे दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे या दोघांकडून ताब्यात घेतले. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल झाला आहे.

