साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदासाठी दोन्ही काॅंग्रेसचा दावा, मुंबईत वेगवान हालचाली - Both the Congress parties claim for the presidency of Sai Baba Sansthan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदासाठी दोन्ही काॅंग्रेसचा दावा, मुंबईत वेगवान हालचाली

सतीश वैजापूरकर
शुक्रवार, 18 जून 2021

येत्या मंगळवारी (ता. २२) या प्रकरणी दाखल जनहित याचिकेची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होईल.

शिर्डी : राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या साईसंस्थानच्या (Saibaba Sansthan) अध्यक्षपदाबाबत महाविकास आघाडीत एकमत होईल की, कारभार निवृत्त न्यायाधीशांकडे जाईल. याबाबत उत्सुकता आहे. दोन्ही कॉँग्रेसने या पदावर दावा केला आहे. हा तिढा सोडवण्यासाठी मुंबईत राजकीय हालचाली वेगाने सुरू आहेत. (Both the Congress parties claim for the presidency of Sai Baba Sansthan)

येत्या मंगळवारी (ता. २२) या प्रकरणी दाखल जनहित याचिकेची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होईल. तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार काही निर्णय घेते की मुदतवाढीचा पर्याय निवडते, हे पहावे लागेल. इच्छुकांचे लक्ष मुंबईकडे लागले आहे.

वहिवाटीने हे अध्यक्षपद आम्हाला मिळायला हवे, ही कॉँग्रेसची तर जिल्ह्यात आमचे राजकीय बळ सर्वाधिक त्यामुळे हे पद आम्हाला द्या. अशी भूमिका राष्ट्रवादी कॉँग्रेसने घेतली. साईसंस्थानचा कारभार सध्या तदर्थ समिती पाहते. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात माजी विश्वस्त उत्तमराव शेळके, संजय काळे व संदीप कुलकर्णी यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू आहे.

मागील सुनावणीच्या वेळी न्यायाधीशांनी पुढील दोन आठवड्यात विश्वस्त मंडळ नेमा अन्यथा अवमाननेची कार्यवाही करू, असा तोंडी इशारा दिला होता. त्याची दखल घेत राज्य सरकार नवे मंडळ नेमते की आणखी मुदतवाढ मागते, हे पहावे लागेल. तदर्थ समितीत समन्वय राहावा, यासाठी साईसंस्थानच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी. अशा याचिकाकर्त्यांची मागणी आहे.

तथापि, मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यात नवे मंडळ नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नियमात बसेल आणि भविष्यात न्यायालयीन आक्षेपात टिकेल, असे मंडळ निवडायचे आहे. शिवसेनेला मुंबईच्या सिद्धि विनायक देवस्थानात अधिक रस आहे. त्यामुळे साईसंस्थानच्या अध्यक्षपदाबाबत शिवसेना उत्सुक नाही. हे पद राष्ट्रवादी कॉँग्रेसला द्यायचे झाल्यास कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, तर कॉँग्रेस पक्षाकडून सत्यजित तांबे यांची नावे चर्चेत आहेत.

वहिवाटीच्या आधारे कॉँग्रेसला संधी मिळाली, तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहमतीने नवा अध्यक्ष निवडला जाईल. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात इच्छुकांची संख्या अधिक आहे. तथापि, ज्येष्ठ नेते शरद पवार त्याबाबत अंतिम निर्णय घेतील. यापूर्वी त्यांनी राज्याचे निवृत्त मुख्य सचिव द. म. सुकथनकर यांना दोन वेळा संधी देत राजकीय नियुक्ती टाळली होती. अर्थात बदलत्या परिस्थिती नुसार निर्णय घ्यावा लागतो.

दरम्यान, साईसंस्थानचे मंडळ नेमण्यासाठीच्या पात्रतेचा भंग झाल्याच्या कारणावरून यापूर्वीच्या एका विश्वस्त मंडळाला पदभार घेतल्यानंतर चोवीस तासात घरी जाण्याची वेळ आली होती. त्यावेळी या प्रकाराला गमतीने सकाळी विश्वस्त-सायंकाळी बरखास्त असे संबोधले जाई. अशी फजिती टाळण्यासाठी पात्रतेचे निकष पूर्ण करून नवी नियुक्ती करण्याचे आव्हान महाविकास आघाडी सरकारपुढे आहे.

 

हेही वाचा..

आमदार काळे की सत्यजीत तांबे

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख