शिंगणापुरच्या शनैश्वर दैवस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर - Board of Trustees of Shaneeshwar Devasthan of Shinganapur announced | Politics Marathi News - Sarkarnama

शिंगणापुरच्या शनैश्वर दैवस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर

सुनील गर्जे
बुधवार, 23 डिसेंबर 2020

देवस्थानची जुनी परंपरा जपण्यासाठी जुन्या जाणत्या ग्रामस्थांनी जी घटना केली व हिंदू धर्माची परंपरा चालू केली होती, ती राखण्याचे मोठे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

 

नेवासे : जगभर लौकिक असलेले शनिशिंगणापूर देवस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची निवड आज जाहीर झाली. ही महत्त्वपूर्ण व सर्वांचे लक्ष लागून असलेल्या विश्वस्त निवडी नगरच्या सहाय्यक धर्मदायक आयुक्तांनी केल्या. एकूण ८४ ग्रामस्थांच्या यासाठी नुकत्याच मुलाखती झाल्या होत्या.

ग्रामस्थांतून विश्वस्तांच्या निवडीची परंपरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या सरकारने कायम जपल्यामुळे शनिशिंगणापूर ग्रामस्थांसह राज्यभरातील भाविकांनी आनंद व्यक्त करीत ठाकरे यांच्या निर्णयाचे कौतुक केले.

श्री शनैश्वर देवस्थानचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचा नियोजनबद्ध विकास सुरू आहे. जगभरातून शनिदर्शनासाठी येथे येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी मोठ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. मंत्री गडाख यांच्या मार्गदर्शनाने देवस्थानच्या माध्यमातून नेवासे तालुक्यासह अनेक जिल्ह्यात सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

विशेषतः यामध्ये मुलांना मोफत वारकरी शिक्षण, पंढरपूर येथे राज्यातील वारकऱ्यासाठी मठ, ग्रामीण रुग्णालय, गोशाळा, राज्यातील रुग्णासाठी आर्थिक मदत, अल्प दारात भोजनालय, बारा महिने रक्तदान शिबिर, वृक्ष संवर्धनासाठी विविध येणाऱ्या भाविकांना देशी वृक्ष रोपांचे वाटप, असे यासारखे  विविध उपक्रम देवस्थान राबवित आहे.

धर्मादाय आयुक्तांनी जाहीर केलेल्या व पारदर्शी पद्धतीने नव्या विश्वस्त मंडळाची निवड केल्याबद्दल सर्वच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत सर्व ताकदीनिशी देवस्थानचे मार्गदर्शक व नवीन विश्वस्तांच्या पाठीशी राहून त्यांना सहकार्य करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त  केला. 

नवीन विश्वस्त मंडळ असे :

बाळासाहेब बन्सी बोरुडे, विकास नानासाहेब बानकर, छबुराव नामदेव भूतकर, पोपट लक्ष्मण कुर्हात, शहाराम रावसाहेब दरंदले, भागवत सोपान बानकर, सुनीता विठ्ठल आढाव, दीपक दादासाहेब दरंदले, शिवाजी अण्णासाहेब दरंदले, पोपट रामचंद्र शेटे, आप्पासाहेब ज्ञानदेव शेटे.

ठाकरे यांनी जुनी घटना व हिंदू परंपरा जपली : मंत्री गडाख 

नवीन विश्वस्त निवड जाहीर झाल्यानंतर देवस्थानचे मार्गदर्शक जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी, " देवस्थान नावारूपाला आणण्यासाठी या गावातील प्रत्येक कुटुंबाचा त्याग आहे. देवस्थानची जुनी परंपरा जपण्यासाठी जुन्या जाणत्या ग्रामस्थांनी जी घटना केली व हिंदू धर्माची परंपरा चालू केली होती, ती राखण्याचे मोठे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पानासनाला प्रकल्पचा लवकरच मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रारंभ होणार असून, येथील विकासासाठी विविध उद्योगपतींशी चर्चा करून सीएसआर फंडातून येथे काम करणार असल्याचे गडाख यांनी सांगितले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख