शिर्डी : कमीत कमी कार्यकर्ते अन् जास्तीत जास्त माध्यम प्रतिनिधींना निमंत्रित करून मोठा गाजावाजा करीत आंदोलन करता येते, हे भारतीय जनता पक्षाने दाखवून दिले. या निमित्ताने आंदोलन करण्याची ही नवी पद्धत चर्चेचा विषय ठरली.
साईबाबांचे समाधी मंदिर खुले करा, या मागणीसाठी या पक्षाच्या आघाडीचे पाच संत आणि पंधरा कार्यकर्ते येथे एकत्र आले. या आंदोलनाच्या थेट प्रक्षेपणासाठी तीसहून अधिक माध्यम प्रतिनिधींनी दिवसभर येथे तळ ठोकला, तर शिघ्र कृती दलासह साठ पोलिसांचा बंदोबस्त तैनात झाला. आंदोलकांची संख्या कमी आणि माध्यम प्रतिनिधींची संख्या अधिक, असे चित्र काल पाहायला मिळाले.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी, शिर्डी हे राज्यव्यापी आंदोलनाचे मुख्य केंद्र असेल हे आधीच जाहीर केले होते. प्रवरानगर येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते लगेच आवर्जून शिर्डीत आले. व्यासपीठासमोर माध्यम प्रतिनिधींच्या कॅमेऱ्यांची गर्दीशिवाय फारसे कोणी नव्हते, तरीही माध्यमे हेच या आंदोलनाचे मुख्य वाहक असल्याचे त्यांना ठाऊक होते. मग त्यांनी या कॅमेऱ्यांना साक्ष ठेवून तिखट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. राज्यपालांचे पत्र आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर त्यांनी पक्षाची भूमिका मांडली.
आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले व नाशिकच्या काळाराम मंदिरातील महंत सुधीरदास यांनी तर माध्यमांसमोर दिवसभर किल्ला लढविला. त्यांना दर अर्ध्या तासाला कुठला ना कुठला प्रतिनिधी येऊन प्रश्न विचारायचा. हे दोघे आळीपाळीने मुख्यमंत्री ठाकरे यांना लक्ष करीत सफाईदार उत्तरे द्यायचे. काही वाहिन्या दिवसभर या प्रश्नोत्तरांचे थेट प्रक्षेपण करीत होत्या.
सायंकाळी सात वाजता एकोणीस आंदोलकांनी आघाडीच्या संतांसोबत साईमंदिरात घुसण्यासाठी आंदोलनस्थळावरून मंदिराकडे कूच केले. त्या वेळचे दृश्य तर फारच मजेदार होते. संख्या अधिक असल्याने माध्यम प्रतिनिधींनी या आंदोलकांना अक्षरशः झाकून टाकले. त्याहून अधिक संख्या पोलिसांची असल्याने त्यांनी या सर्वांना झाकून टाकले. अटक करण्याची वेळ आली तसे कॅमेरे आंदोलकांवर रोखले गेले. कॅमेरे बंद झाले आणि राज्यव्यापी आंदोलनाचे एकदाचे सूप वाजले.
Edited By - Murlidhar Karale

