अकोले पंचायत समितीवर भाजपचाच झेंडा, सभापतीपदी उर्मिला राऊत - BJP's flag on Akole Panchayat Samiti, Urmila Raut as chairperson | Politics Marathi News - Sarkarnama

अकोले पंचायत समितीवर भाजपचाच झेंडा, सभापतीपदी उर्मिला राऊत

शांताराम काळे
गुरुवार, 23 जुलै 2020

पंचायत समितीचे यापूर्वीचे सभापती (कै.) दत्तात्रेय बोऱ्हाडे यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या समितीत 12 पैकी 11 सदस्य मतदानाचा हक्क बजावणार होते. या निवडणुकीत भाजपचे 8 व विरोधी गटाचे 3 सदस्य होते.

अकोले : रिक्त झालेल्या पंचायत सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उर्मिला राऊत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दुपारी हा निकाल जाहीर केला. या निमित्ताने भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांचेच वर्चस्व पंचायत समितीवर कायम राहिले आहे.

पंचायत समितीचे यापूर्वीचे सभापती (कै.) दत्तात्रेय बोऱ्हाडे यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या समितीत 12 पैकी 11 सदस्य मतदानाचा हक्क बजावणार होते. या निवडणुकीत भाजपचे 8 व विरोधी गटाचे 3 सदस्य होते. त्यामुळे विरोधी गटाने सभापतीपदासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. ही पंचायत  समिती माजी आमदार वैभव पिचड यांच्या अधिपत्याखाली आहे. त्या मुळे पुन्हा एकदा भाजपचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे.

निवडीनंतर नवनिर्वाचितांचा सत्कार करण्यात आला. या वेळी भाजप कार्यालयात माजी आमदार वैभव पिचड, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, ज्येष्ठ नेते गिरजाजी जाधव, जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, आदिवासी सेवक काशीनाथ साबळे आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापती राऊत, उपसभापती दत्तात्रय देशमुख, माजी सभापती रंजना मेगाळ, सीताबाई गोंदके, माधवी जगधने, सारिका कडली, अलका अवसरकर, गोरख पथवे आदींचा या वेळी सत्कार करण्यात आला.

पिचड यांच्यामुळेच संधी ः राऊत

उर्मिला राऊत म्हणाल्या, माझ्याकडे कोणतेही राजकीय वलय व वारसा नसताना  माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील महिलेस तालुक्यातील सर्वोच्च सभापतीपद देऊन माझा नव्हे, संपूर्ण समाजाचा सन्मान केला आहे. या कामी माजी आमदार वैभव पिचड यांनी विशेष लक्ष गातले. या पदाचा उपयोग मी समाजाच्या हितासाठी करेल. माझ्या सर्व सदस्य विशेषतः महिला सदस्यांनी दिलेली साथ स्मरणात राहील.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख