वारे बहाद्दर ! पाथर्डीतील भाजपचा वाद थेट राष्ट्रीय अध्यक्षांकडे, नड्डा यांना नोटीस - BJP's dispute in Pathardi goes directly to the national president, notice to Nadda | Politics Marathi News - Sarkarnama

वारे बहाद्दर ! पाथर्डीतील भाजपचा वाद थेट राष्ट्रीय अध्यक्षांकडे, नड्डा यांना नोटीस

राजेंद्र सावंत
शनिवार, 25 जुलै 2020

जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष यांनी ही मंडळ कार्यकारीणी रद्द करावी. कार्यकारीणी रद्द न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सुनिल पाखरे व नागनाथ गर्जे यांनी दिला आहे.

पाथर्डी : भाजपच्या कार्यकारिणीचा वाद चव्हाट्यावरच नव्हे, तर थेट न्यायालयात जावू पाहत आहे. तालुका कार्यकारिणीची निवड ही पक्षाच्या घटनेच्या विरोधात असल्याचे सांगून एका गटाने थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. एव्हढेच नव्हे, तर वकिलांमार्फत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना नोटीस देवून इतिहास घडवला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्ष व कार्यकारीणीची निवड पक्षाच्या घटनेविरोधी आहे. पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजुला करुन माणिक खेडकर यांनी आमदार राजळे यांच्या सांगण्यावरुन भाजपाचे खोटे रेकाॅर्ड तयार केले. जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष यांनी ही मंडळ कार्यकारीणी रद्द करावी. कार्यकारीणी रद्द न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सुनिल पाखरे व नागनाथ गर्जे यांनी दिला आहे.

भारतीय जनता पक्षाचे पाथर्डीतील ज्य़ेष्ठ कार्यकर्ते व अॅड. दिनकर पालवे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस पाखरे व गर्जे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, आमदार मोनिका राजळे, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांना बजावली आहे.  

दोन गट सक्रीय

पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षात दोन गट आहेत. जुना (निष्ठावंत) व नव्याने आलेले आमदार मोनिका राजळे यांचे समर्थक. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरुन भाजपातील अनेक नेत्यांनी मोनिका राजळे यांना भाजपाने उमेदवारी देवु नये, यासाठी जंगजंग पछाडले. त्यामधे पाथर्डी- शेवगावमधील भारतीय जनता पक्षाच्या अनेक दिग्गजांचा समावेश होता. नुकतीच पाथर्डी तालुक्याची भारतीय जनता पक्षाची तालुका मंडळ पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये भाजपाच्या घटनेचे उल्लघन केले असून, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले आहे. आमदार मोनिका राजळे व तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी त्यांच्या स्वार्थासाठी इंदिरा काँग्रेस पक्षाच्या असलेल्या व राजळे यांची हुजरेगिरी करणाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने पक्षाच्या कार्यकारणीत स्थान दिले आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

24 ऐवजी 141 आले कसे

पाथर्डी तालुका मंडळात 24 सदस्यांचा समावेश करण्याची घटनेच्या कलम १४ (१) नुसार तरतुद असताना येथे १४१ जणांचा समावेश करण्यात आला आहे. निष्ठावंताना डावलल्याने पक्षाची मोठी हानी होण्याची शक्यता असल्याने कार्यकारीणी बरखास्त करा, अन्यथा निवडीविरोधात थेट न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सुनिल पाखरे व नागनाथ गर्जे यांनी दिला आहे.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख