जामखेड तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींवर भाजप झेंडा ! राम शिंदे यांचा दावा - BJP wins 23 seats in Jamkhed taluka! Ram Shinde's claim | Politics Marathi News - Sarkarnama

जामखेड तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींवर भाजप झेंडा ! राम शिंदे यांचा दावा

वसंत सानप
बुधवार, 20 जानेवारी 2021

जामखेड तालुक्यात आपण केलेल्या विकास कामांच्या बळावरच एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीचे सदस्य भाजपाचे निवडून आले आहेत.

जामखेड : जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींपैकी 23 ग्रामपंचायतीची सत्ता भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली. निम्याहून अधिक भाजपचे सदस्य निवडून आलेले आहेत," असा दावा माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला.

चौंडी (ता. जामखेड) येथे माजी मंत्री राम शिंदे यांच्यावतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशीद, उपसभापती रवी सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी माजी मंत्री राम शिंदे म्हणाले, "जामखेड तालुक्यात आपण केलेल्या विकास कामांच्या बळावरच एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीचे सदस्य भाजपाचे निवडून आले आहेत. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये चार ग्रामपंचायती भाजपच्या निवडून आलेल्या आहेत. तसेच भाजपाच्या विचाराचे निम्म्याहून अधिक ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत. विरोधकांनी विकासाच्या गप्पा मारल्या आहेत, असा आरोपही शिंदे यांनी केला.

सदस्यांची पळवापळवी केल्यास जशास तसे उत्तर

दहशतवाद, दादागिरी, गुंडागिरी हे शब्द विरोधकांकडून खपवून घेतले जाणार नाही, असे सांगितले जात आहे, मात्र दहा वर्षात आम्ही या गोष्टी कधी केल्या नाहीत आणि करणारही नाहीत, मात्र सरपंच पदाच्या निवडणूक प्रक्रियाच्या वेळी सदस्यांची पळवापळवी जर केली, तर जशास तसे उत्तर आम्ही देऊ, असा इशारा शिंदे यांनी दिला.

 

 

हेही वाचा.

आता लक्ष सरपंचपदाच्या आरक्षणाकडे

जामखेड : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सरपंच पदाच्या आरक्षणाकडे सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे लक्ष लागले असून, नेमके कोणाच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडणार, याचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे.

जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली. बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. यामध्ये खर्डा साकत, चौंडी या प्रमुख गावांमध्ये स्वतः घरी पराभवाचा सामना करण्याची वेळ आली. या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या विचाराचे अधिकाधिक सदस्य निवडून आले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत. ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर निश्चितपणे होईल, अशी स्थिती आहे.

नगरपालिका पंचायत समिती व जिल्हा परिषद या तिन्ही ठिकाणी भाजपाचे चार चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांची संख्या अधिक आहे, मात्र विधानसभा निवडणुकीनंतर या दोन्ही ठिकाणी सत्तांतर झाले. सदस्यांनी भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचा घरोबा केला आणि आमदार रोहित पवार यांच्या हातात नगरपालिका व पंचायत समितीचे सत्तेची सूत्रे गेली. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आमदार रोहित पवार यांना मिळालेला कॉल पाहता येणाऱ्या निवडणुका चुरशीच्या होतील. आमदार रोहित पवार यांचा विजयाचा महामेरू रोखण्यासाठी माजी मंत्री राम शिंदे नेमकी कोणती रचना करतात आणि हो सुरू झालेली पडझड रोखण्यासाठी त्यांच्याकडून नेमके काय प्रयत्न होतात, हे येणारा काळच सांगेल. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख