BJP-NCP district president will now join hands in the city | Sarkarnama

नगरमध्ये आता भाजप - राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांत जुंपणार

मुरलीधर कराळे
शनिवार, 30 मे 2020

भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेले आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी खोडून काढले.आता त्या खरमरीत टीकेला मुंडे काय उत्तर देणार, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.

नगर : भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेले आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी खोडून काढले.आता त्या खरमरीत टीकेला मुंडे काय उत्तर देणार, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे. तथापि, कोरोनाच्या काळात गेले तीन महिने शांत असलेले हे नेते आता राजकीय कलगीतुऱ्यासाठी सरसावले आहेत, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या काळात लोकांना मदतीसाठी काही लोकप्रतिनिधी, नेते, सामाजिक संस्था, दानशूर नागरिक धावून आले. काही नेते मात्र लाॅकडाऊनचे कारण सांगून घरातच बसून राहिले. तथापि, पक्षाचे वरिष्ठ पदे घेवून मिरविणाऱ्या मंडळी मात्र गेल्या तीन महिन्यांत प्रकाशात आल्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या अंतीम टप्प्यात मात्र आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्याने लोकांची करमणूक सुरू आहे. 
भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी पालकमंत्र्यांवर आरोप करताना ते कुठे फिरकलेच नाही, असे काल पत्रकार परिषदेत म्हटले होते. जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभलेले हसन मुश्रीफ जिल्हा हॉटस्पॉट जाहीर होऊनसुद्धा गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यात कुठेही फिरकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात गेल्या दोन महिन्यांत अत्यंत चांगले काम केले आहे. मात्र, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी गेल्या दोन महिन्यांत प्रशासनाकडून कुठलाही आढावा घेतला नाही. भाजपचे माजी मंत्री, आमदार यांनी मोठ्या प्रमाणात जनतेला मदत केली. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांकडून तशी मदत झाली नाही. त्याचा उपयोग जिल्ह्याला झाला नाही, असा आरोपही मुंडे यांनी केला.

भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या या आरोपाला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष फाळके यांनी प्रसिद्धी पत्रकारतून मात्र जोरदार उत्तर दिले. ते म्हणाले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी कोरोना व्हायरसच्या या महामारीच्या काळात राजकारण करु नये. जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत कुठे? हे विचारण्याच्या आगोदर  त्यांनी आगोदर माहिती घेऊन बोलावे. राज्यात जसे विरोधी पक्ष नेते 'खोटे बोल पण रेटून बोल' करत आहेत, त्याच पध्दतीने जिल्ह्यातील भाजपा नेते वागत आहेत. २१ मे ला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन प्रशासनाला निर्देश दिले. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नगर विश्रामगृहात शिक्षणासंदर्भात माहिती देवून महाविद्यालयीन युवकांना आधार दिला, या गोष्टी भाजपच्या जिल्हाध्यक्षांना दिसत नाहीत काय. राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी नगरला जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप आढावा बैठक घेतली. या बैठकिचा वृत्तांत भाजपच्या नेत्यांपर्यंत जात नाही काय, असे सांगून राज्यात जसे विरोधी पक्ष नेते 'खोटे बोल पण रेटून बोल' करत आहेत, त्याच पध्दतीने जिल्ह्यातील भाजपा नेते वागत आहेत, असा आरोप केला.

नगर जिल्ह्यात भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष आहेत. तथापि, कोरोनाच्या काळात कोणीही विशेष बाहेर पडले नसल्याची टीका समाजमाध्यमांतून व्यक्त होत होती. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनीही कोरोनाच्या काळात मंत्र्यांसोबत उपस्थितीशिवाय खूप काही केले असल्याचे एेकिवात नाही. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या एकमेकांवर टीकाश्रामुळे नागरिकांची करमणूकच होत आहे, अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख