BJP MLAs insist on Pachpute agitation | Sarkarnama

कुकडीचे पाणी पेटले ! भाजपचे आमदार पाचपुते आंदोलनावर ठाम

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 29 मे 2020

पिण्याचे पाणी व फळबागांसाठी 1 जूनपासून पाणी न सोडल्यास तहसील कार्यालयासमोर लॉकडाउनचे सर्व नियम पाळून उपोषण करू, असा इशारा पाचपुते यांनी दिला आहे.

श्रीगोंदे : उन्हाची तीव्रता वाढल्याने पिण्याचे पाणी फळबाग व इतर चारापिकांना देण्याची गरज आहे. "कुकडी'चे आवर्तन यापूर्वीच सुटेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुणे जिल्ह्यातील बंधारे भरण्यासाठी पाणी सोडले. हा कुकडी डाव्या कालव्यावरील शेतकऱ्यांवर घोर अन्याय आहे. आवर्तन सोडण्याचा निर्णय न झाल्यास सोमवार (ता. 1 जून) पासून उपोषण करण्याचा इशारा आमदार बबनराव पाचपुते यांनी दिला. 

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदन पाठविले असून, त्यावर पाचपुते यांच्यासह प्रा. तुकाराम दरेकर, संदीप नागवडे व गणपतराव काकडे यांची नावे आहेत. 
पाचपुते म्हणाले, की मार्च-एप्रिलमध्ये "कुकडी'चे आवर्तन 46 दिवस चालले होते. त्यात श्रीगोंद्याला 12 दिवस पाणी देताना पूर्व भागातील वितरिका 10, 11, 12, 13 व 14 वरील शेतकरी वंचित ठेवले. औटेवाडी व घोडेगाव तलावाखालील शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरण्यासाठी पैसे गोळा करून जलसंपदा विभागाकडे भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, विभागाने पैसे स्वीकारले नाहीत आणि पाणीही दिले नाही. त्यामुळे उचल पाण्याची परवानगी असणारे शेतकरी वंचित राहिले. 

पिण्याचे पाणी व फळबागांसाठी 1 जूनपासून पाणी न सोडल्यास तहसील कार्यालयासमोर लॉकडाउनचे सर्व नियम पाळून उपोषण करू, असा इशारा पाचपुते यांनी दिला आहे. दरम्यान, राजेंद्र नागवडे यांनीही पाणी सोडण्याची मागणी केली आहे. जलसंपदामंत्री व अधिकाऱ्यांना त्यांनी पत्रव्यवहार केल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

हेही वाचा...

नेप्ती बाजार समिती मध्यरात्रीपर्यंत सुरू 

नगर : दादा पाटील शेळके नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात भाजीपाला आणि फळांचे लिलाव शेतकरी व खरेदीदार यांच्या आग्रहास्तव रोज संध्याकाळी सहा ते रात्री 12 या वेळेत सुरू राहतील. रोज पहाटे चार ते सकाळी आठ या वेळेत सुद्धा भाजीपाला व फळे विक्री नेप्ती उपबाजार येथे सुरू राहील, असा निर्णय सभापती अभिलाष घिगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

रोज सायंकाळी होणाऱ्या भाजीपाला व फळांच्या लिलावामुळे राज्यातील इतर प्रमुख बाजारपेठांत म्हणजेच पुणे, मुंबई, कल्याण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद या ठिकाणी नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथून शेतमाल जास्तीत जास्त पाठवता येईल. यामुळे शेतकऱ्यांच्या मालालाही बाजारभाव जास्त मिळेल. तसेच शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त शेतीमाल विक्रीस आणता येईल. त्याबरोबर वाहतूक खर्चातही बचत होईल, असा विश्वास सभापती घिगे यांनी व्यक्त केला. समितीचे उपसभापती संतोष म्हस्के, संचालक हरिभाऊ कर्डिले, रेवणनाथ चोभे, संतोष कुलट, दिलीप भालसिंग उपस्थित होते. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख