पाथर्डी : अकोला ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्ष व स्थानिक आघाडीच्या कार्यकर्त्यांचा सामना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनलसोबत रंगला आहे. भाजपने धायतडकवाडी येथील जागा बिनविरोध जिंकून राष्ट्रवादीला आगामी निकालाची झलक दाखविली आहे. राष्ट्रवादीने दहा जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला असून, नेतृत्वाला तसा शब्द पॅनलप्रमुख अनिल ढाकणे यांनी दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते ऍड. प्रताप ढाकणे व भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या समर्थकामधील ही लढत लक्षवेधी ठरेल.
अकोला हे माजी केंद्रीयमंत्री बबन ढाकणे यांचे गाव. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत येथे ऍड. प्रताप ढाकणे यांचे चुलतभाऊ राष्ट्रवादीचे अनिल ढाकणे यांच्या पॅनलचा पराभव झाला होता. भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळविली होती. अडीचवर्षे सरपंचपद भाजपने टिकविले. मात्र अनिल ढाकणे यांनी भाजपमधील काही सदस्य हाताशी धरुन ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवून आणले होते. या वेळी भाजपचे नारायण पालवे, सुभाष केकाण, संभाजी गर्जे, हरिभाऊ धायतडक, गंगाधर गर्जे, नवनाथ धायतडक यांच्या पॅनलचा अनिल ढाकणे यांच्या पॅनलशी कडवा संघर्ष सुरू आहे. गेल्या वेळच्या पराभवाचा वचपा काढणार आणि दहा जागा राष्ट्रवादीच जिंकणार, असा चंग अनिल ढाकणे यांनी बांधला आहे.
अनिल ढाकणे यांच्या नेतृत्वाची कसोटी लागली आहे. भाजपने मात्र छुप्या पद्धतीने राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. राष्ट्रवादी अंतर्गत नाराजी शमते, की भाजपच्या पथ्यावर पडते, हे निकालानंतरच समजेल.
प्रभाग तीनमधील लढत लक्षवेधी ठरणार
अनिल ढाकणे व संभाजी गर्जे यांच्यातील प्रभाग तीनमधील लढत लक्षवेधी ठरणार आहे. येथे "लक्ष्मी'चा चमत्कार होतो, की शिकाऱ्याचीच शिकार होते, हे जनमत ठरवणार आहे. तालुक्यातील प्रमुख लक्षवेधी लढतीत ही लढत आहे. दोन्ही बाजू तुल्यबळ असल्याने विजय कोणाचा होईल हे सांगणे कठीण आहे.
Edited By - Murlidhar Karale