भाजप सरकारने तरुणांचा भ्रमनिरास केला : सत्यजीत तांबे - BJP government misled the youth: Satyajit Tambe | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप सरकारने तरुणांचा भ्रमनिरास केला : सत्यजीत तांबे

आनंद गायकवाड
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने सहा वर्षात तरुणांचा मोठा भ्रमनिरास केला आहे. अनेक सहकारी संस्था मोडीत काढून खासगीकरणाला बळकटी दिली आहे.

संगमनेर : दरवर्षी दोन कोटी नोकर्‍या देण्याचे आमिष दाखवणाऱ्या भाजप सरकारने देश व राज्यातील तरुणांचा पुर्णपणे भ्रमनिरास केला आहे. लॉकडाऊन नंतर उद्भवलेल्या बेरोजगारीवर मात करण्य़ासाठी केंद्र सरकारने मदत करावी. सुशिक्षीत व गरजू तरुणांना तातडीने नोकर्‍या उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, संगमनेर युवक काँग्रेसच्यावतीने तहसीलदार अमोल निकम यांना निवेदन देत केंद्र सरकारकडे रोजगाराची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने सहा वर्षात तरुणांचा मोठा भ्रमनिरास केला आहे. अनेक सहकारी संस्था मोडीत काढून खासगीकरणाला बळकटी दिली आहे. जीएसटी, नोटाबंदी या आत्मघातकी निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली आहे. त्यातच दुर्दैवाने आलेल्या कोरोना संकट काळात देशात लॉकडाऊनमुळे साधारण 12 ते 15 कोटी लोक बेरोजगार झाले असून, बेरोजगारीचा दर 8 टक्क्यांवर पोचला आहे. ढासळलेली अर्थव्यवस्था व वाढलेल्या बेरोजगारीला पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे. केंद्राने जाहीर केलेले 20 लाख कोटींचे पॅकेज केवळ घोषणा ठरली असून, त्यातून कोणत्याही घटकाला मदत झाली नाही. सहकारी व लघुउद्योगांना सक्षम करण्यासाठी आर्थिक पॅकेजची आवश्यकता आहे. तसेच या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांना नोकर्‍या उपलब्ध होण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष सांगळे, निखील पापडेजा, सोमेश्‍वर दिवटे, सचिन खेमनर, रमेश गफले, तान्हाजी शिरतार, भागवत कानवडे आदि पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख