भाजपनेच केला `ध` चा `मा` ! प्राजक्त तनपुरेंनी केला हल्लाबोल

शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम करीत आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांवर पोलिस कारवाईची वेळ कधीही आणणार नाही.
prajakt tanpure.jpg
prajakt tanpure.jpg

राहुरी : "पोलिस बंदोबस्तात वीजबिल वसुली करू, वीज तोडू, शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करू, असे मी कुठेही बोललो नाही; मात्र माझ्या तोंडी तसे घालून "ध'चा "मा' केला जात आहे. भाजपने मला बदनाम करण्याचे षडयंत्र चालविले आहे. शेतकऱ्यांनी भाजपच्या अपप्रचाराला बळी पडू नये. वीजबिल सवलत योजनेचा लाभ घ्यावा,'' असे आवाहन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. 

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम करीत आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांवर पोलिस कारवाईची वेळ कधीही आणणार नाही. तालुक्‍यात मागील दहा वर्षांत ऊर्जाविषयक पायाभूत कामे झाली नाहीत. त्यामुळे सर्व रोहित्रांवर "ओव्हरलोड' आला. आता नवीन शंभर रोहित्रे दिली. तीन उपकेंद्रे मंजूर केली असून, त्याची निविदाप्रक्रिया सुरू होईल. येत्या दोन-तीन वर्षांत तालुक्‍यातील एकही रोहित्र "ओव्हरलोड' राहणार नाही.'' 

नवीन ऊर्जा धोरणात कृषिपंपांच्या थकीत वीजबिलावर 60 ते 70 टक्के सवलत योजना सुरू आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना ती समजावून सांगावी. पूर्वकल्पना न देता वीज खंडित करू नये, अशा सूचना केल्या आहेत. वीजबिलाची 66 टक्के रक्कम जिल्ह्यातील ऊर्जाविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी वापरली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना बिलात सवलत व उच्च दाबाने, सुरळीत वीजपुरवठा करता येईल, असे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

तेली खुंट (नगर) येथे महावितरण कार्यालयाच्या दारात गुंड प्रवृत्तीचा व्यक्तीला हटकणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली. त्या वेळी कर्मचाऱ्यांना मानसिक आधार देताना, "अशा घटना खपवून घेणार नाही. प्रसंगी महावितरण कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण देऊ,' असे बोललो होतो. मात्र, त्याचा संदर्भ वीजबिलाच्या वसुलीशी लावत, शेतकऱ्यांची माथी भडकविण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचा आरोप मंत्री तनपुरे यांनी केला. 

दरम्यान, अनेक ठिकाणी शेतीपंपांची वीज तोडली जात आहे. अनेक ठिकाणी रोहित्रांवरील यंत्रसामग्री उतरविली जात आहे. असे असताना शेतकऱ्यांकडून मात्र थकबाकी भरली जात नाही. त्यामुळे अधिकारी वीजजोड तोडत आहेत. त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत असून, किमान वीज तोडू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ऊर्जामंत्री तनपुरे यांच्याकडे याबाबत अनेक शेतकरी मागणी करीत असून, अधिकाऱ्यांकडून वीजबिल भरण्याचे सल्ले देत आहेत. अशी परिस्थिती महाराष्ट्रभर दिसून येत आहे.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com