शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून भाजप देश रसाताळाला घेऊन चालला : थोरात - BJP crushed the farmers' agitation and took the country to Rasatala: Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून भाजप देश रसाताळाला घेऊन चालला : थोरात

आनंद गायकवाड
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस पक्षाचे महत्वाचे योगदान राहिले आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातही सर्वांना बरोबर घेऊन देशाला उभे करण्याचे काम काँग्रेसने केले आहे.

संगमनेर : इंदिरा गांधी यांनी भारत एक शक्तीशाली देश असल्याची ओळख जगाला करुन देण्याचे काम केले. परंतु दुर्दैवाने 2014 नंतर देशातील वातावरण बदलले आहे. जाती, धर्मात विष कालवण्याचे, समाजात तेढ निर्माण करून सत्ता मिळवण्याचे काम सुरु आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. भाजप सरकार देश रसातळाला घेऊन जात आहे. परंतु पुन्हा एकदा सर्वांना बरोबर घेऊन एकजुटीने देश उभा करण्याचे काम करावे लागणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

मुंबईतील टिळक भवनात झालेल्या काँग्रेस स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस पक्षाचे महत्वाचे योगदान राहिले आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातही सर्वांना बरोबर घेऊन देशाला उभे करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लावलेली विकासाची मुहूर्तमेढ दिवंगत लालबहाद्दुर शास्त्री, इंदिरा व राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथावर राहिली.

थोरात म्हणाल, की देशात विविध स्वायत्त संस्था उभ्या राहिल्या, औद्योगिक विकासाची गंगा वाहिली. मोठ मोठे प्रकल्प उभे राहिले. 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर एका नेतृत्वाची गरज होती. त्यातून 1885 साली राष्ट्रीय सभा म्हणजे काँग्रेसची स्थापना झाली. लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने देशात एक लढा उभा केला. काँग्रेसच्या स्थापनेमुळे भारत एक राष्ट्र म्हणून जगाला ओळख झाली. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभर आंदोलने करून ब्रिटिश सत्तेच्या विरोधात संघर्ष केला. मीठाचा सत्याग्रह, अहसहकार चळवळीच्या माध्यमातून देशात सर्वांना बरोबर घेऊन एक लढा उभा राहिला. 1942 ला चले जाव ची हाक दिली गेली आणि नंतर 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य लढ्यात सर्व देश एकजुटीने काँग्रेसच्या झेंड्याखाली एकवटला. भारताला वैभवशाली राष्ट्र म्हणून उभे करण्यात काँग्रेसची महत्वाची भूमिका राहिली आहे. आजची परिस्थीती वेगळी आहे ती बदलण्याचे काम करावे लागणार असल्याचे थोरात म्हणाले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख