विखे पाटील यांची वर्षभरातील ही आहे सर्वात मोठी उपलब्धी - This is the biggest achievement of Vikhe Patil throughout the year | Politics Marathi News - Sarkarnama

विखे पाटील यांची वर्षभरातील ही आहे सर्वात मोठी उपलब्धी

सतीश वैजापूरकर
मंगळवार, 15 जून 2021

कोविड प्रकोपात मतदारसंघातील जनतेसाठी साईसंस्थान, प्रवरा वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालये मिळून एक हजार बेडची उपचार व्यवस्था तातडीने उभारता आली.

शिर्डी : ‘‘कोविड (Corona) प्रकोपात मतदारसंघातील जनतेसाठी साईसंस्थान, प्रवरा वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालये मिळून एक हजार बेडची उपचार व्यवस्था तातडीने उभारता आली. बंद असलेला खासगी ऑक्सिजन प्लँट पुढाकार घेऊन वेळेत सुरू करता आला. त्यामुळे आणीबाणीच्या काळात ऑक्सिजनची टंचाई दूर झाली. या जागतिक महामारीत मतदारसंघात थांबून जनतेला शाश्‍वत आधार देता आला, ही माझ्या दृष्टीने या वर्षभरातील सर्वांत मोठी उपलब्धी ठरली,’’ असे मनोगत माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. (This is the biggest achievement of Vikhe Patil throughout the year)

विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या बोलताना त्यांनी वरील शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील महत्त्वाचे नेते म्हणून ते परिचित आहेत. शेती, सहकार, शिक्षण, नागरी समस्या आणि कृषी क्षेत्रातील जाणकार या नात्याने त्यांनी आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले आहे.

राज्याचे कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी त्यांनी घेतलेले निर्णय दिशादर्शक ठरले. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून पीकविमा योजना कशी राबवावी, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन शेतमालाचे भाव पाडले तर कृषिमंत्री हस्तक्षेप करून त्यांना सरळ करू शकतात, शेतकऱ्यांना वेठीला धरू पाहणाऱ्या बड्या बियाणे कंपन्यांवर कारवाई करता येते, हे त्यांनी दाखवून दिले.

विखे पाटील म्हणाले, ‘‘शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील विकासाचे ‘मॉडेल’ म्हणून ओळखला जातो. कोविड आपत्तीच्या काळात अतिशय वेगाने मतदारसंघात वैद्यकीय सुविधा उभ्या करण्यात यश मिळाले. मतदारसंघाच्या शेजारच्या एका गावात खासगी ऑक्सिजननिर्मिती प्लँट सुरू करण्यास तांत्रिक अडचणी येत होत्या. पुढाकार घेऊन हा प्लँट सुरू करण्यात मला यश मिळाले. त्यामुळे राहाता तालुक्याबरोबरच शेजारच्या दोन-तीन तालुक्यांत आणीबाणीच्या प्रसंगी निर्माण झालेली ऑक्सिजनची टंचाई दूर झाली, याचे फार मोठे समाधान वाटते. साईसंस्थानच्या कोविड रुग्णालयाला येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आपण वेळोवेळी पुढाकार घेतला. या रुग्णालयात जिल्हा व जिल्ह्याबाहेरील शेकडो रुग्ण भरती होऊन बरे होत आहेत.’’

‘‘नगर येथील विळद घाटातील विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेले सुसज्ज कोविड रुग्णालय आणि लोणीत प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या सुसज्ज कोविड रुग्णालयाने दोन्ही कोविड लाटांत महत्त्वाची भूमिका बजावली. लोणीत प्रवरा महाविद्यालयाच्या इमारतीत सुरू केलेले प्रवरा कोविड सेंटर रुग्णांना आधार ठरले. या कोविड सेंटरला फार मोठा लोकसहभाग प्राप्त झाला. विविध संस्था, संघटना व पदाधिकाऱ्यांनी पहिल्या दिवसापासून मदतीचा ओघ सुरू केला. हा लोकसहभाग पाहून मी अक्षरशः भारावून गेलो.

मतदारसंघातील खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांना पाठबळ दिले. शक्य होईल त्या डॉक्टर मंडळींनी कोविड रुग्णालये सुरू करून आपत्ती निवारणास हातभार लावला. या काळात मतदारसंघात तब्बल एक हजार कोविड बेडची व्यवस्था उभी राहिली, याचे समाधान वाटते,’’ असे ते म्हणाले.

हेही वाचा...

कोरोना कमी होतोय

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख