नगर : ``अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेला झालेल्या नफ्यातून पुर्वी कारखान्यांना कर्ज वाटप व्हायचे. मी संचालक झाल्यापासून या गोष्टींना विरोध करीत शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायासाठी कर्ज देण्याचे काम केले. त्यामुळे दुग्धोत्पादन वाढले. जिरायत भागातील शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मोठा आधार झाला,`` असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले.
नगर तालुक्यातील रतडगाव, देवगाव, आगडगाव आदी गावांतील शेतकऱ्यांना कर्जाच्या धनादेशांचे वाटप मागील आठवड्यात झाले. आगडगाव येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी जिल्हा बॅंकेच्या कामकाजाविषयी माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती सांगितले. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, माजी सभापती विलास शिंदे, सरपंच मच्छिंद्र कराळे, माजी सरपंच यशवंत पालवे, शिवाजी कराळे, विक्रम पालवे, पोपट कराळे, रामदास कराळे, परसराम कराळे तसेच बॅंकेचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
कर्डिले म्हणाले, की कारखान्यांना कर्ज इतर मार्गानेही उपलब्ध होत असते. परंतु शेतकऱ्यांना केवळ जिल्हा बॅंक हीच आधार ठरली आहे. सेवा संस्थांच्या माध्यमातून कर्ज वितरीत करण्यात येते. त्यामुळेच आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांना कसा आधार मिळेल, यासाठी प्रयत्न केला. नगर जिल्ह्यातील सेवा संस्था इतर जिल्ह्याच्या तुलनेत चांगले काम करतात. त्यामुळेच इतर जिल्ह्यातील जिल्हाबॅंकेच्या तुलनेत अहमदनगर जिल्हा बॅंक अत्यंत चांगले काम करते. आशिया खंडात सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेली ही बॅंक शेतकऱ्यांचा तारणहार ठरली आहे. सध्या अतिपावसामुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना या कर्जरुपाने दीपावलीची भेट मिळत आहे. मच्छिंद्र कराळे यांच्या रुपाने या गावात तरुण, तडफदार सरपंच मिळाला आहे. अनेक विकास कामांबाबत त्यांचा आग्रह असतो. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा.
सभापती घिगे यांनी बाजारसमितीचे काम चांगले असून, विरोधकांनी केलेले आरोप केवळ राजकीय आकसापोटी केले असल्याचे स्पष्ट केले. विलास शिंदे म्हणाले, की माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यामुळे आपल्या डोंगरी पट्ट्यातील गावांना चांगला न्याय मिळत आहे. जिल्हा बॅंकेकडून मिळालेल्या या कर्जाचा फायदा शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल.
सरपंच मच्छिंद कराळे यांनी गावातील शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकेकडून मिळालेल्या आधाराबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य बॅंकेकडून वेळोवेळी होणाऱ्या मदतीमुळे राखले गेल्याचे त्यांनी सांगितले.

