शिर्डीतील साईसंस्थानच्या रुग्णालयात मोठे आर्थिक षडयंत्र - Big financial conspiracy at Sai Sansthan Hospital in Shirdi | Politics Marathi News - Sarkarnama

शिर्डीतील साईसंस्थानच्या रुग्णालयात मोठे आर्थिक षडयंत्र

सतीश वैजापूरकर
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

रुग्णांच्या नातेवाइकांना दर वर्षी बाहेरून तीस ते चाळीस कोटी रुपये किमतीची औषधे व वैद्यकीय साहित्य खरेदी करावे लागते. या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी होणे गरजेचे आहे. 

शिर्डी : साईसंस्थानच्या दोन्ही रुग्णालयांत वार्षिक आर्थिक तरतुदीच्या तुलनेत केवळ पंचवीस ते तीस टक्के औषधखरेदी केली जाते. त्यामुळे सरकारी वैद्यकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या रुग्णांना खासगी दुकानांतून औषधे व वैद्यकीय साहित्य विकत घ्यावे लागते. वर्षाकाठी तीस ते पस्तीस कोटी रुपयांची औषधे व साहित्य बाहेरून घेतले जाते. यामागे फार मोठे आर्थिक षडयंत्र व आर्थिक देवाणघेवाण आहे. गुन्हे अन्वेषण विभागामार्फत याची चौकशी केली जावी, अशी मागणी माहितीच्या अधिकारातील कार्यकर्ते ऍड. संदीप कुलकर्णी यांनी साईसंस्थानच्या तदर्थ समितीच्या अध्यक्षांकडे पाठविलेल्या निवेदनात केली आहे. 

हेही वाचा... नगर जिल्हा नंबर वन

निवेदनात म्हटले आहे, की साईसंस्थानने या गंभीर बाबीची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमून अहवाल मागवावा. साईसंस्थानच्या दोन्ही रुग्णालयांत औषधे व वैद्यकीय साहित्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. अडचणीच्या वेळी रुग्णांना बाहेरील खासगी औषध दुकानांतून खरेदी करण्याशिवाय पर्याय राहत नाही. गंभीर बाब अशी, की रुग्णांच्या नातेवाइकांना लिहून दिलेल्या यासाठीच्या याद्या परत घेतल्या जातात. त्यामुळे तक्रारदेखील करता येत नाही. जीवनदायीसारख्या योजनेच्या लाभार्थी रुग्णांना औषधे मोफत द्यावी लागतात. मात्र, ती मुद्दाम शिल्लक ठेवली जात नाहीत. 

वार्षिक औषध व साहित्य खरेदी अंदाजपत्रक व प्रत्यक्ष खरेदीतील तफावत लक्षात घेतली, तर याचा अर्थ असा निघतो, की रुग्णांच्या नातेवाइकांना दर वर्षी बाहेरून तीस ते चाळीस कोटी रुपये किमतीची औषधे व वैद्यकीय साहित्य खरेदी करावे लागते. या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी होणे गरजेचे आहे. दरम्यान, हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजणार आहे.

हेही वाचा... शेवगाव नगरपरिषदेत हरकतींचा पाऊस 

वार्षिक औषध व साहित्यखरेदी अंदाजपत्रक व प्रत्यक्ष खरेदीतील तफावत अशी (वर्ष, अंदाजपत्रकातील तरतूद, कंसात प्रत्यक्ष खरेदी) ः 
2015-16 - 55 कोटी (19 कोटी) 
2016-17 - 60 कोटी (17 कोटी) 
2017-18 - 55 कोटी (19 कोटी) 
2018-19 - 60 कोटी (22 कोटी) 
2019-20 - 50 कोटी (21 कोटी) 

अंदाजपत्रकात तरतूद केल्यानंतर त्यानुसार रक्कम खर्च झाली नाही, तर अखर्चित रकमेवर साईसंस्थानला कर भरावा लागू शकतो. ही रक्कम फार मोठी असू शकते. यादृष्टीनेदेखील या आर्थिक देवाणघेवाणीच्या षडयंत्राकडे पाहायला हवे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. 
- ऍड. संदीप कुलकर्णी, माहितीच्या अधिकारातील कार्यकर्ते 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख