This is a big challenge in Karjat-Jamkhed | Sarkarnama

राम शिंदे यांना डावलले : आता कर्जत-जामखेडमध्ये हे मोठे आव्हान

वसंत सानप
रविवार, 10 मे 2020

भाजपने प्रा. शिंदें यांच्या पुनर्वसनाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे पुढील काळात मतदारसंघात राष्ट्रवादी जोमात राहील आणि भाजप मात्र कोमात जाईल, असे चित्र निर्माण झाल्यास नवल ही वाटायला नको.

जामखेड : विधानपरिषद निवडणुकीत माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांना पक्षाने डावल्याने कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या एकहाती सत्तेच्या राजकारणाला बळकटी मिळाली आहे. तर भाजपसमोर कार्यकर्त्यांची फळी टिकून ठेवण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर उभे ठाकले आहे.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ तब्बल पंचवीस वर्षे भाजपचा बालेकिल्ला राहिला. मात्र आमदार रोहित पवार यांनी या मतदारसंघाला 'खिंडार' पाडले आणि 'राष्ट्रवादी' च्या घड्याळाचा गजर केला. विधानसभेपाठोपाठ पंचायत समितीच्या सभापती निवडीत भाजपला धोबीपछाड देऊन कर्जतची सत्ता 'राष्ट्रवादी'ला मिळविली. 
आमदार पवार यांनी केवळ मतदारसंघ हेच कार्यक्षेत्र न ठेवता संपूर्ण राज्यात आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली. आमदार पवार यांच्या राजकारणाची 'झेप' पाहता त्यांना मतदारसंघात खेळवून ठेवण्यासाठी 'भाजप' खेळी खेळेल आणि त्यांच्यासमोर माजी मंत्री राम शिंदे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देईल, असे राजकीय मांडे शिजले जात असतानाच सारे मनसुबे धुळीस मिळाले आणि राम शिंदेंच्या उमेदवारीलाच भाजपने अर्धचंद्र दिला. त्यामुळे अधिच आवसान हरवलेल्या कार्यकर्त्यांचा राहिलेला थोडासा 'धीर' ही खचला आहे. प्रा. शिंदेही विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून मतदारसंघापासून काहीसे दूर राहिले आहेत. विधानपरिषदेची आमदारकी मिळाली, की ते मतदारसंघात सक्रीय राहतील, असे कार्यकर्ते खासगीत बोलत होते. मात्र त्यांची या वेळी ही संधी हुकली असून, पुन्हा नेमकी किती वर्षे त्यांना प्रतीक्षा करावी लागेल, याचे उत्तर काळच देणार आहे. भाजपने प्रा. शिंदें यांच्या पुनर्वसनाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे पुढील काळात मतदारसंघात राष्ट्रवादी जोमात राहील आणि भाजप मात्र कोमात जाईल, असे चित्र निर्माण झाल्यास नवल ही वाटायला नको.

आमदार पवार यांचा जनतेशी वाढता संपर्क
आमदार रोहित पवार यांनी निवडणुकीपासूनच थेट जनतेशी संपर्क ठेवला आहे. निवडणुकीनंतर त्यात अधिकची भर पडली आहे. भाजपचा पारंपरिक मतदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'माधव' पॅटर्नला त्यांनी खिंडार पाडले आहे. आपलेसे केले आहे. त्यामुळे यापुढे कर्जत-जामखेडमध्ये सर्व सत्तास्थाने आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली 'राष्ट्रवादी' काबीज करील, अशी पोषक राजकीय स्थिती निर्माण झाली आहे.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख