This is a big announcement by Agriculture Minister Bhuse to promote organic farming | Sarkarnama

सेंद्रीय शेतीला प्रोत्साहनासाठी कृषिमंत्री भुसे यांची ही मोठी घोषणा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 मे 2020

राज्य शासन `बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजना` आणत आहे, या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सक्षम बनविणार आहोत. गटशेती तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सेंंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार आहोत.

नगर : ``महाराष्ट्रात विपुल प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध आहे. या नैसर्गिकपणे उपलब्ध असणाऱ्या कृषि मालाचे ब्रॅण्डिंग करुन तो शहरातील ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचविण्यात मदत होईल. राज्य शासन बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजना आणत आहे, या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सक्षम बनविणार आहोत. गटशेती तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सेंंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार आहोत,`` असे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी केले. 

राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठात जागतिक बँक अर्थसहाय्यीत, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्राद्वारे `सेंद्रिय शेती निविष्ठा वापर, उत्पादन, प्रमाणीकरण आणि विपणन व्यवस्था` या विषयावर एक आठवड्याचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्याचा समारोप भुसे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांशी त्यांनी ऑनलाईन संवाद साधला.अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा उपस्थित होते. 

या वेळी भुसे म्हणाले, की शेतकरी उत्पादन घेतो, पण ते विकणे अवघड जाते. या लॉकडाऊन स्थितीमध्ये काही शेतकऱ्यांनी स्वतः शेती उत्पादन विक्रीचे प्रयोग केले व ते यशस्वी झाले. याच उत्पादनाला ब्रॅण्डिंगची जोड दिली, तर नक्कीच शेतीमालाला जास्त दर मिळतील. सेंद्रिय शेती मालाचे प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न राज्य शासन करणार आहे. सेंद्रिय शेतीचे धोरण ठरवताना शेतकऱ्यांनी मांडलेल्या सुचनांचा विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षणाला राज्यातून सुमारे 1000 शेतकर्यांनी सहभाग नोंदवला. या एक आठवड्याच्या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्रातिनिधीक स्वरुपात 5 प्रशिक्षणार्थीना मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत ऑनलाईन प्रशस्तीपत्रकाचे वाटप करण्यात आले.  

शेतकरी गटाच्या माध्यमातून प्रोत्साहन

राज्यामध्ये एकुण 1585 शेतकरी गट असून, त्यामध्ये सुमारे 65 हजार शेतकरी जोडले गेले आहेत. सध्या  राज्यात 35 हजार हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जात आहे. या गटांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देवून बळकटीकरण केले जाईल. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महात्मा फुले कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करुन ज्ञानदानाचे काम केले, याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे कौतुक केले. या परिस्थितीत मनुष्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सेंद्रिय कृषि माल सेवन करणे उपयुक्त ठरेल. त्यामुळे सेंद्रिय शेतीला भविष्य काळात मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला.

आगामी काळात सेंद्रीय शेतीला महत्त्वकुलगुरु डॉ. विश्वनाथा म्हणाले, की कोरोनाच्या या लॉकडाऊन कालावधीमध्ये कृषि विद्यापीठाने 22 ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम शेतकरी, विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसाठी आयोजीत केले असून, अशा प्रकारचा उपक्रम देशामध्ये प्रथमच होत आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठात सेंद्रिय शेतीवर संशोधन सुरु आहे. रासायनिक खते व किटकनाशकांच्या असमतोल वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत असून, मानवी आरोग्यास धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभुमीवर येत्या काळात सेंद्रिय शेतीला अधिक महत्व प्राप्त होणार आहे. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख