आता पोलिसांना सायकली ! आयुक्त कृष्णप्रकाश यांचा फिटनेस फंडा - Bicycle to the police now! Fitness Fund of Commissioner Krishnaprakash | Politics Marathi News - Sarkarnama

आता पोलिसांना सायकली ! आयुक्त कृष्णप्रकाश यांचा फिटनेस फंडा

उत्तम कुटे
गुरुवार, 7 जानेवारी 2021

पोलिसांना कायम फिट ठेवण्याचा हेतू असलेला हा `हेल्थ ३६५` कार्यक्रम सकाळी होत आहे, हे विशेष.

पिंपरी : सर्वाधिक तंदुरुस्त तथा फिट आय़पीएस अधिकारी असलेले पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आपल्या पोलिसांनाही फिट ठेवण्याचा विडा आता उचलला आहे. त्यासाठी ते शहर पोलिस दलातील सर्व पोलिसांना स्मार्ट वॉच तसेच सायकली उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देणार आहेत.

पोलिसांना कायम फिट ठेवण्याचा हेतू असलेला हा `हेल्थ ३६५` कार्यक्रम सकाळी होत आहे, हे विशेष.

अल्ट्रामॅन आणि आर्यनमॅन हा जागतिक पुरस्कार मिळवणारे कृष्णप्रकाश हे देशाच्या नागरी सेवेतील पहिले अधिकारी आहेत. जेमतेम तीन महिन्यातच त्यांनी आपल्या कामाचा ठसा पोलिस आयुक्त म्हणून उद्योगनगरीत उमटवलेला आहे. ते प्रामाणिक,कार्यक्षम आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जातात. स्वत केले, मग सांगितले या न्यायानुसार त्यांनी आता आपले पोलिस दलही तंदुरुस्त व सुदृढ करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ते आयुक्तालयातील सर्व तीन हजार पोलिसांना स्मार्ट वॉच देणार आहेत. त्याव्दारे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांना या स्मार्ट वॉचव्दारे लक्ष ठेवता येणार आहे. आऱोग्यातील बिघाड लगेच समजणार असल्याने त्यावर उपायही करून खाते सुदृढ करण्याचा आयुक्तांचा मानस आहे. पोलिसांचा फिटनेस कायम राहावा,यासाठी त्यांना सायकलीही देण्यात येणार आहेत. उद्या या दोन्ही वस्तूंचे वाटप उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी नऊ वाजता होत आहे. यावेळी ग्रामसुरक्षा दलाचा शुभारंभही (कम्यूनिटी पोलिसिंग) होणार आहे. त्यातील स्वंयसेवकांना ओळखपत्रे या वेळी अजितदादांच्या हस्ते दिली जाणार आहेत.
 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख