अकोले : रात्री वाढदिवसाची जोरदार पार्टी झाली. सुमारे चाळीस तरुण या पार्टीला उपस्थित होते. नी सकाळी हॉटेलचा मालक, त्याचा मुलगा व घरातील अजून एका महिला आदींसह तब्बल ११ व्यक्तींना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. भंडारदरा येथील ते हाॅटेल कोणाच्या आशिर्वादाने सुरू होते, असा प्रश्न आता ग्रामस्थांना पडला आहे.
तालुका प्रशासनाने तातडीने १०८ क्रमांक रुग्णवाहिका बोलावून सर्वांना अकोले व संगमनेर येथे हलविले. तर त्या ४० व्यक्तींना शोधून त्यांना होम क्वारंटाईन केले. याबाबत डॉ. संतोष चोळके यांनी माहिती दिली.
हे क्षेत्र प्रतिबंधात्मक कक्षेत घोषित करण्यात आले असून, ते सील केले आहे. त्यामुळे वसाहतीत असलेले हॉटेल समाधान कोणाच्या आशीर्वादाने चालू होते? असा सवाल भंडारदरा गावच्या ग्रामस्थानी प्रशासनाला केला आहे.
भंडारदरा येथील ग्रामस्थ व भंडारदरा वसाहतीतील नागरिक हादरून गेले आहेत. हे हाॅटेल सुरू ठेवण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्यांनी कारवाईस टाळाटाळ केली, त्यांच्यासह हाॅटेलमालक व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे. पुढील दोन दिवसात कार्यवाही व्हावी, अन्यथा भंडारदरा ग्रामस्थ ग्रामपंचायत व कोरोना कमिटी कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सरपंच पांडुरंग खाडे यांनी सांगितले.
या हाॅटेलमध्ये मुंबई येथून चार दिवसांपासून पर्यटक येऊन जेवण करून जातात. स्थानिक कमिटीने पोलीस, तहसील कार्यालय, पाटबंधारे विभाग उपअभियंता रोटे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन ही बाब निदर्शनास आणून देऊनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे हॉटेल मालकासह ११ लोक बाधित झाले असून, यास जबाबदार कोण, असा सवाल विचारून भंडारदरा ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. तसेच अशी वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी संबंधितांनी प्रशासनाची परवानगी घेतली होती का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
Edited By - Murlidhar Karale

