नेवासे : देश-विदेशात लौकिक असलेल्या शनी शिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी भागवत बानकर, तर उपाध्यक्षपदी विकास बानकर यांची सर्वानुमते निवड झाली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी अभिनंदन केले.
शनी शिंगणापूर येथे श्री शनैश्वर देवस्थानच्या सभागृहात आज सकाळी दहा वाजता नवनियुक्त विश्वस्तांची नूतन पदाधिकारी निवडीसाठी बैठक पार पडली. त्यात
अध्यक्ष : भागवत बानकर, उपाध्यक्ष : विकास बानकर, कोषाध्यक्ष : दीपक दरंदले, सरचिटणीस : बाळासाहेब बोरुडे, चिटणीस : अप्पासाहेब शेटे यांच्या सर्वानुमते निवडी करण्यात आली.
श्री शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांच्या निवडी (ता. २३) डिसेंबर रोजी जाहीर झाल्या होत्या. अकरा विश्वस्तपदासाठी एकूण ८४ ग्रामस्थांनी नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज करून मुलाखती दिल्या होत्या.
दरम्यान, मागील सरकारच्या काळात ज्येष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख व राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात विकसित झालेले शनैश्वर देवस्थानची केवळ राजकीय कटकारस्थान करून देवस्थानसह शनी शिंगणापूर गावची बदनामी व्हावी. तसेच हे देवस्थान ग्रामस्थांच्या हातून थेट सरकार जमा व्हावे, यासाठी तक्रारीच्या माध्यमातून मोठे षडयंत्र रचण्यात आले होते.
मात्र, देवस्थानचे मार्गदर्शक व राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे शिंगणापूर ग्रामस्थांच्या हक्क व अधिकार अबाधित राहावा, यासाठी देवस्थानच्या विश्वस्तांच्या निवडी ग्रामस्थांमधूनच रूढी व परंपरे नुसारच व्हाव्यात, यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसारच ग्रामस्थांचा हक्क अबाधित ठेवत देवस्थानच्या रूढी व परंपरेनुसार ग्रामस्थांतून विश्वस्तांच्या पारदर्शक पद्धतीने निवडी जाहीर झाल्या. विशेषतः यामध्ये सर्व समावेशक विश्वस्त झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नूतन अध्यक्ष - उपाध्यक्ष व पदाधिकारी निवडीप्रसंगी या वेळी छबुराव भूतकर, पोपट कुऱ्हाट, शहाराम दरंदले, सुनीता आढाव, शिवाजी दरंदले, पोपट शेटे या विश्वस्तांसह देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले, जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परंपरा राखली : भागवत बानकर
जुन्या जाणत्या लोकांनी जी घटना केली व हिंदू धर्माची रूढी व परंपरा चालू केली होती. ती परंपरा राखण्याचे मोठे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे, तसेच जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचा आणखी विकास करून शनी भक्तांना जास्तीतजास्त व चांगल्या दर्जाच्या सुविधा निश्चित दिल्या जातील, असा विश्वास नूतन अध्यक्ष भागवत बानकर यांनी निवडी नंतर व्यक्त केला.
Edited By - Murlidhar Karale

