नगर : यावर्षी पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाचे पेपर आणि बी. एड. सामायिक प्रवेश (सीईटी) परीक्षाचे अनेक विद्यार्थ्यांचे पेपर एकाच दिवशी आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना बी. एड. सीईटी देता आली नाही. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांना केली आहे.
या पत्रात डाॅ. तांबे यांनी म्हटले आहे, की कोरोना परिस्थितीमुळे सर्व विद्यापीठांनी ऑनलाइन परीक्षा घेतल्या. बी. एड. साठी सीईटी प्रवेश परीक्षा ही ऑनलाईन परीक्षेच्या एकाच दिवशी आल्याने अनेक विद्यार्थी या परीक्षेला बसू शकले नाही, त्यामुळे ही परीक्षा देऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांची संधी हुकली आहे. त्यांचे शैक्षणिक वर्ष नुकसान होऊ नये, यासाठी ही परीक्षा पुन्हा घेतली पाहिजे, राज्यात सर्वत्र होणार्या या विविध परीक्षांमुळे विद्यार्थ्यांची आणि गैरसोय झाली आहे. ज्या परीक्षा एकाच दिवशी आल्या आहेत. त्या परत घेतल्या जाव्यात, अशी मागणीही नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. तांबे यांनी केली आहे. या मागणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून, बी. एड. सामायिक परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

