सावधान ! मोबाईलवरील लुडो गेम करतोय कुटुंबाचाच `गेम`

1896 मध्ये लंडन येथे राॅयल नेव्हीच्या सैनिकांमध्ये हा खेळ लोकप्रिय होता. याच वेळी लुडो हा प्रकार सुरू झाल्याचे मानले जाते. मोबाईलक्रांतीनंतर मोबाईलमध्ये या गेमने आपले स्थान निश्चित केले. `लुडो किंग` हा मोबाईलवर 20 फेब्रुवारी 2016 रोजीरिलिज झाला.
ludo
ludo

नगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅक डाऊन असल्याने संपूर्ण कुटुंबातील सदस्य घरात आहेत. टाइमपास म्हणून यापूर्वी युवकांकडून खेळत असलेला लुडो गेम यानिमित्ताने घराघरात पोहचला आहे. पती-पत्नी, मुले, मित्र असे अनेकजण हे गेम खेळतात. या गेमने आता कुटुंबाचाच `गेम` केल्याची उदाहरणे आहेत. बहुतेक घरात भांडणे लावण्याचे कामही तो करतो आहे.

हजारो वर्षांची परंपरा
लुडो या प्रकारातील गेमला तशी हजारो वर्षांची परंपरा आहे. सहाव्या शतकात भारतात या खेळाचा शोध लागल्याचे मानले जाते. अजिंठा, वेरुळ लेण्यांमध्येही या खेळाचा पट दगडांमध्ये कोरलेला आहे. मुघलांच्या काळातही हा खेळ पचिसी या नावाने ओळखला जात होता. एक ते सहा अंक असलेली कवडी व त्यावर खेळली जाणारी चाल, असे त्याचे स्वरुप असे. पुढे सोंगाड्याचा खेळ म्हणूनही त्याचा एक प्रकार उदयास आला. ज्याच्या सोंगाड्या आधी पोहचतील, तो विजयी ठरतो. याच प्रकारतल्या द्युतक्रिडा हा खेळ खेळताना महाभारत घडले. `पचिसी` हा खेळ मुगल कालखंडात जास्त खेळला जात असे. 1896 मध्ये लंडन येथे राॅयल नेव्हीच्या सैनिकांमध्ये हा खेळ लोकप्रिय होता. याच वेळी लुडो हा प्रकार सुरू झाल्याचे मानले जाते. मोबाईलक्रांतीनंतर मोबाईलमध्ये या गेमने आपले स्थान निश्चित केले. `लुडो किंग` हा मोबाईलवर गेम 20 फेब्रुवारी 2016 मध्ये रिलिज झाला. 

गेममुळे अशी लागली भांडणे
मोबाईलमध्ये लुडो गेेम खेळताना चिमुरडीने मोबाईल हिसकावल्याच्या कारणाने पती-पत्नीचे भांडण होऊन पत्नीने मुलाला बदडले. ते सोडविण्यावरून पतीवर रागवत पत्नीने स्वतःला पेटवून दिल्याची घटना धारावी (मुंबई) येथे 2017 मध्ये घडली होती. या महिलेचा भाजून मृत्यू झाला. कन्नड (जि. आैरंगाबाद) तालुक्यातील गुदमा या गावात येथे 7 नोव्हेंबर 2019 रोजी लुडो गेम खेळताना दोन मित्रांचे भांडण होऊन एकाने दुसऱ्याचा डोके ठेचून खून केल्याची घटना घडली होती. कळमनुरी (हिंगोली) येथील एका भागात लुडो गेमवर जुगार खेळताना पोलिसांनी सात जणांवर गुन्हे दाखल केले होते. 28 हजार रुपये रोख व मोबाईल जप्त करण्यात आला होता.

सोशल डिस्टन्सचा बोजवारा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे. तथापि, एकाच मोबाईलवर चारजण हा गेम खेळत असल्याने एकमेकांच्या डोक्यात डोके घालून बसल्यासारखी परिस्थिती होते. शेतात झाडाखाली, एखाद्या खोलीत, घरात लोक कोणतेही सोशल डीस्टन्स न ठेवता हा गेम खेळत असल्याने सोशल डिस्टन्सचा या गेममुळे बोजवारा उडाला आहे.  

असा खेळतात गेम
`लुडो किंग` हा गेम बहुतेक तरुण व गृहिणींच्या मोबाईलमध्ये असतो. दोन किंवा चार जणांना एकाच वेळी खेळता येतो. जुन्या पद्धतीच्या चंफुलसारखा असलेला हा गेम खेळताना ज्याच्या कवड्या सर्वात आधी संपूर्ण राऊंड मारून मध्यभागी असलेल्या घरात पोहोचेल, तो विजयी होतो. हा पैशावर खेळला जात असेल, तर पहिल्या दोन व्यक्तींना पैसे दिले जातात. त्यातही प्रथम विजयी होणाऱ्याला जास्त पैसे दिले जातात. घरात खेळताना मात्र पती-पत्नी, कुटुंबातील इतर सदस्य खेळतात. एकमेकांची कवडी मारल्यानंतर आवाज करून एकमेकांवर रागवण्याचे प्रकारही होतात.

असा बनतो सुपर किंग
`सुपर लुडो रीअल स्टा`र हा हेमही लुडो किंगचाच एक आॅनलाईन प्रकार आहे. याला वेगवेगळ्या देशांमध्ये `पार्कीसी` आणि `लाडूहू` असेही म्हटले जातात. भारतीय बोर्ड गेम्समध्ये प्रत्येक खेळाडू एक रंग निवडतात. आॅनलाईन खेळताना इतरांना हरविल्यास `लुडोचा सुपर किंग बनले`, असे म्हटले जाते. एक व्यक्ती असला, तरीही हा गेम खेळता येतो. दुसरा व्यक्ती म्हणून गेमची प्रणाली काम करते. अशा वेळी एक व्यक्ती खेळत असताना दुसरीकडून आपोआप कवड्या पडतात. 
 
लुडो गेमचे दुष्परिणाम
- लुडो किंग हा मोबाईल गेम एक प्रकारचा जुगार आहे.
- तरुणाई जास्त आहारी गेल्याने बहुतेकांच्या मोबाईलमध्ये हा गेम असतो.
- पती-पत्नीही गेम खेळतात. त्यांच्यात एकमेकांच्या कवड्या मारण्यावरून भांडणे होतात.
- मुले अभ्यास करण्याचे सोडून गेममध्ये वेळ घालतात
- एकाच मोबाईलमध्ये चारजण डोके घालून खेळत असल्याने सोशल डिस्टन्सिचा बोजवारा
- पैशावर गेम खेळणारे जुगाराच्या आहारी. आर्थिक झळ बसते.
- पत्त्यांप्रमाणे हा गेम खेळताना वेळेचे भान राहत नाही.
- हारल्याचा राग आपल्या मुलांवर निघतो.
- सतत गेम खेळत राहणाऱ्यांरे मुले चिडचिडे होतात. त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रीत करता येत नाही.
- पपजी गेमसारखाच हा धोकादायक गेम

अभासी दुनियेत घेवून जाणारा गेम
कोणतेही मोबाईलवरील गेम हे मानवी मेंदूला जखडून ठेवतात. त्यामुळे माणूस अभासी दुनियेत जातो. वास्तवातील गोष्टींशी त्याची नाळ तुटत जाते. मेंदूला ज्या गोष्टींची सवय लावतो, तसाच तो काम करतो. गेमची सवय लागलेली मुले पुढे त्रास देतात. `पपजी` प्रमाणेच `लुडो किंग` हा गेमही धोकादायक आहे. तो खेळताना मुले स्वतःला हरवून जातात. पती-पत्नी खेळत असतील, तर इतके रममान होतात, की मुलांकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे मुले चिडचिडी होऊन मोबाईल हिसकावून घेण्याचे प्रकार होतात. त्यातूनच मुलांना मार खावा लागतो. लाॅक डाऊनच्या काळात अशी उदाहरणे दिसून आली. मुलांना या गेमपासून बाजूला ठेवले पाहिजे. 
- डाॅ. राजेंद्र धामणे, मानसशास्त्रज्ञ
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com