Be careful, go to the native village, be prepared for quarantine | Sarkarnama

सावधान, मूळ गावी जायचे, तर क्वारंटाईनची तयारी ठेवा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 2 मे 2020

बाहेरगावांवरून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होऊन संबंधित व्यक्तीचे संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. त्याचबरोबर 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

नगर : बहुतांश व्यक्ती या ना त्या मार्गाने आपापल्या गावात येत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. मात्र, आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून बाहेरगावाहून गावात येणाऱ्या व्यक्तीवर "कोरोना ग्रामसुरक्षा समिती'चा वॉच राहणार आहे.  त्यासाठी प्रशासनाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत.

बाहेरगावांवरून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होऊन संबंधित व्यक्तीचे संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. त्याचबरोबर 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कलम 188 नुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गावचे सरपंच समितीचे अध्यक्ष, तर पोलिस पाटील सदस्य सचिव असतील. याशिवाय तलाठी व ग्रामसेवक सदस्य राहणार आहेत. ऊसतोड कामगार, पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातून आलेले विद्यार्थी आदी आपापल्या गावाकडे बाहेरून वास्तव्यास येत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

समितीची जबाबदारी 
बाहेरील व्यक्तीस विनापरवानगी गावात प्रवेश देऊ नये, परवानगी असल्यास तहसीलदारांच्या निदर्शनास आणावे, संबंधित व्यक्तीची नोंद ठेवणे बंधनकारक, संस्थात्मक विलगीकरणासाठी जागा निश्‍चित करावी, संबंधित व्यक्तीच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारावेत, सारी व कोरोनाची लक्षणे आढळल्यास कोविड केअर सेंटरला कळवावे, अशी कामे समितीला करावी लागणार  आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख