अकोले : अकोले तालुक्यात कोरोना रुग्ण अधिक वेगाने वाढत असून, आपण सामाजिक भावनेतून या संकटाला सामोरे जाऊ. शासन व प्रशासनाच्या भरवशावर न राहता आपणच सर्वजण पुढे येऊन यावर मार्ग काढू, मात्र तुम्ही आमच्यासोबत रहा, असे अवाहन माजी आमदार वैभव पिचड यांनी केले.
अकोले विश्रामगृहावर झालेल्या खासगी डॉक्टरांच्या बैठकीत ते बोलताना होते. आज अकोले तालुका डाॅक्टर असोशिएशनचे सदस्यांची पिचड यांनी बैठक घेतली. या वेळी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली.
सध्या अकोले तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे. ग्रामिण भागात प्रमाण वाढत आहे. त्यावर काय उपाय योजना करता येतील, त्यावर बैठकित डाॅक्टरांनी आपले मत मांडले. अकोले येथे सीटीस्कॅन उपलब्ध करावे, अॅम्बुलन्सची कमतरता आहे. तसेच आवश्यक ते आैषधांचा पुरवठा व्हावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
पिचड म्हणाले, की दोन-तीन दिवसांत एक अॅंम्बुलन्स उपलब्ध करुन देतो. अकोले येथे कोविड सेंटर कमी पडत आहेत. त्यामुळे नव्याने ५० बेडचे कोविड सेंटर सुरू करीत आहोत. त्यासाठी डाॅक्टर उपलब्ध करुन देणे आणि सरकारने औषधोपचार पुरविणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा पुरेपूर वापर करणे अशा नियमांचे सर्वांनी पालन करावे.
या वेळी जितेंद्र पिचड, सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शंभू नेहे, अकोले तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल वाघ, डॉ. भांडकोळी, डॉ. अमित काकड आदी उपस्थित होते.
दरम्यान, अकोले तालुक्यात भंडारदरा तसेच इतर पर्यटनस्थळे आहेत. तेथे बाहेरच्या तालुक्यातून पर्यटक येतात. सध्या पर्यटन बंद असले, तरीही लोक येताना दिसतात. त्यांच्यापासून कोरोनाचा धोका संभवतो. त्यामुळे नागरिकांनीही पर्यटक दिसल्यास त्याला भंडारदरा येथे जाण्यापासून रोखण्याची गरज असल्याचे मत व्यक्त झाले. तालुक्यात कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजनचा पुरवठा, औषधांची उपलब्धता करून देण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणीही डाॅक्टरांकडून करण्यात आली.
Edited By - Murlidhar Karale

