नगर : जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे गावोगावचे राजकीय वातावरण तापले होते. त्यासाठी मतदान झाल्यावर आता जिल्हा बॅंकेची रणधुमाळी सुरू होणार आहे. बॅंकेच्या 21 जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे गावागावांतील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यंदा प्रथमच गावपातळीवरील निवडणुका बिनविरोध होण्यासाठी नेत्यांनी पुढाकार घेतला. त्यात काही प्रमाणात यश येऊन, 61 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी काल मतदान झाले. हे वातावरण थंड होण्यापूर्वीच जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
जिल्हा बॅंकेच्या मतदारांची अंतिम मतदारयादी सात जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे लवकरच जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होण्याचे संकेत मिळाले होते. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी बॅंकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 21 जागांसाठी 19 ते 25 जानेवारीदरम्यान उमदेवारी अर्जविक्री व दाखल करणे, 27 जानेवारीला अर्जांची छाननी, 28 जानेवारीला उमेदवारांची यादी, 28 जानेवारी ते 11 फेब्रुवारीदरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर 12 फेब्रुवारीला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. 20 फेब्रुवारीला मतदान, तर 21 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा...
बनावट खरेदीखत; आरोपीला पकडले
नगर : मृत व्यक्तीच्या जागी तोतया उभा करून, कर्जत तालुक्यातील गुरव पिंप्री येथील जमिनीचे बनावट खरेदीखत केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आज एकास जेरबंद केले. पुरुषोत्तम बापूराव कुरुमकर (वय 40, रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदे) असे त्याचे नाव आहे.
कर्जत तालुक्यातील गुरव पिंप्री येथील 22 एकर जमिनीच्या मूळ मालकाचा मृत्यू झाला आहे. असे असताना बनावट खरेदीखत तयार करून आरोपी पुरुषोत्तम कुरुमकर, निंभोरे (रा. घोटवी, ता. श्रीगोंदे) व त्यांच्या साथीदारांनी मिळून ही जमीन एकनाथ बाळासाहेब बांदल (रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) व त्यांच्या साथीदारांना विकली. हा प्रकार समोर आल्यावर कर्जत पोलिस ठाण्यात कुरुमकर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. आरोपी कुरुमकर आज नगर परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून शहरातील लाल टाकी परिसरातून त्यास अटक केली.
Edited By - Murlidhar Karale

