ऊर्जामंत्री तनपुरेंच्या आदेशाला केराची टोपली ! वीज खंडीत करण्याचे प्रकार सुरूच - A basket of bananas to the order of Energy Minister Tanpur! Power outages continue | Politics Marathi News - Sarkarnama

ऊर्जामंत्री तनपुरेंच्या आदेशाला केराची टोपली ! वीज खंडीत करण्याचे प्रकार सुरूच

संजय आ. काटे
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे श्रीगोंद्याच्या दौऱ्यावर आले असताना, वीजबिल वसुलीबाबत मंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते घनश्‍याम शेलार यांच्याकडे केली होती.

श्रीगोंदे : कृषिपंपांची थकबाकी वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांची वीज तोडू नका, अगोदर सरकारची धोरणे शेतकऱ्यांना सांगण्यासाठी गावात जा, असा आदेश ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरण अधिकारी- कर्मचाऱ्यांना दिला. मात्र, त्यांनी तो गांभीर्याने घेतला नाही. उलट, आता सोशल मीडियाद्वारे "पोस्ट' टाकून वीजपुरवठा खंडित करण्याचे धाडस महावितरणचे कर्मचारी करीत आहेत. तनपुरे यांच्या आदेशाला महावितरणने केराची टोपली दाखविल्याचे समोर आले आहे. 

ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे श्रीगोंद्याच्या दौऱ्यावर आले असताना, वीजबिल वसुलीबाबत मंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते घनश्‍याम शेलार यांच्याकडे केली होती. त्यावर शेलार यांनी मंत्र्यांना थेट महावितरण कार्यालयात नेले. मात्र, तेथे अधिकारीच हजर नसल्याने सावळा गोंधळ समोर आला. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करीत, तनपुरे यांनी, शेतकऱ्यांना विजेची बिलेच मिळत नाहीत, याबाबत सरकारने जी धोरणे घेतली आहेत, ती शेतकऱ्यांना सांगून त्यावर अंमलबजावणी करा; मगच वसुलीबाबत वेगळा निर्णय घ्या. तोपर्यंत कोणाचाही वीजपुरवठा खंडित करू नका, असे स्पष्ट आदेश दिले होते. 

श्रीगोंद्यातील विजेची समस्या व वसुलीबाबत शुक्रवारी आढावा बैठक लावल्याचेही तनपुरे यांनी स्पष्ट केले होते. मात्र, तनपुरे निघून गेले आणि महावितरणने पुन्हा एकदा कृषिपंपांच्या बिलांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे धाडस केले. आता तर सोशल मीडियात पोस्ट टाकून, "थकबाकीदार शेतकऱ्यांनी किमान पाच हजार रुपये भरले तरच वीज सुरू होईल. आठ तासांपैकी एकच तास शेतीची वीज येईल, सात तास बंद राहील,' असे बजावण्याचे धाडस केले आहे. या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी अधिकारी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे तनपुरे यांच्या जिल्ह्यातच त्यांच्या आदेशाला कुठलीही किंमत नसल्याचे बोलले जाते. 

रोहित्र बंद न करता वीजबिलाची वसुली 

कुकडी व घोड धरणातून शेतीचे आवर्तन सुरू असतानाच, वीज वितरण कंपनीने वीजबिल वसुलीच्या नावाखाली रोहित्रे बंद करण्याची मोहीम हाती घेतली होती. अशा प्रकारे वसुली थांबविण्याच्या मागणीसाठी पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. महावितरण अधिकाऱ्यांनी रोहित्र बंद न करता, वीजबिल वसुलीची हमी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. 

लगड म्हणाले, की शेतकऱ्यांकडे कृषिपंपाची थकबाकी असली, तरी त्याला अनेक कारणे आहेत. गेले वर्षभर कोरोनामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले. त्यात दुष्काळ, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक अडचणीत शेतकरी भरडला गेला. त्यामुळे रोहित्र बंद न करता, वसुली करावी. लगड यांच्या उपोषणाची दखल घेत, महावितरण अधिकाऱ्यांनी रोहित्र बंद न करता, वसुली करू, नेत्यांनी शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख