कर्जत : कर्जत नवे पर्व हा जनतेचा अपेक्षाभंग आहे, त्यांना सोशल मीडियावर मार्केटिंग करण्यात मोठा रस आहे. आम्ही केलेल्या कामाचे उद्घाटन करण्यात ते धन्यता मानत असून, विकासाच्या नावाखाली अशी ही बनवाबनवीचा प्रयोग चालू आहे. `मोठं खेडं` ही ओळख पुसून कर्जतला शहराचे रूप दिले. आगामी निवडणुकीत विकासाला साथ द्या, असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी केले.
येथील नगरपंचायतच्या वतीने समर्थ गार्डन, शहा गार्डन व विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार डॉ. सुजय विखे पाटील होते. नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, मुख्याधिकारी गोविंद जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर आदी या वेळी उपस्थित होते.
प्रा. शिंदे म्हणाले, की जे केलं ते सांगा, झालं त्याच्याकडे पाहू नका. जनतेने दहा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी दिली. पाच वर्ष मंत्रिपद भूषवलं. मी पूर्णपणे समाधानी आहे. मात्र नवे पर्व म्हणून जनतेची दिशाभूल करीत निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांनी एका वर्षात एक तरी विकास काम मंजूर करून आणले ते दाखवावे. अद्यावत कोव्हिडं सेंटर कुठे आहे? आपण कर्जत शहरासाठी सव्वाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली. इथून पुढेही शहराचा उर्वरित विकास साधायचा असेल, तर भाजप आणि मित्र पक्षाला साथ द्यावी.
खासदार विखे पाटील म्हणाले, की समर्थ गार्डन आणि शहा गार्डन यांच्यामुळे शहराच्या वैभवात आणि नावलौकिकात भर पडली आहे. सध्याचे आघाडी सरकार हे सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून, जर केंद्र शासन सगळी मदत करत असेल, तर हे राज्य शासन काय करते. शेतकऱ्यांना दिलासा नाही, नैसर्गिक आपत्तीचे मदत नाही. तसेच विकास खुंटला आहे. कर्जत नगरपंचायतमध्ये आगामी निवडणुकीत माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप मित्र पक्षाची सत्ता येईल, यात शंका नाही.
नामदेव राऊत म्हणाले, की स्वप्नामधील कर्जत उभे करण्याचा शब्द गेल्या निवडणुकीत आम्ही दिला होता. तो शुद्ध नळपाणी पुरवठा योजना, सुस्थितीत रस्ते, अद्यावत स्मशानभूमी, अंडरग्राउंड गटर, समर्थ व शहा गार्डन यांसह विकास कामाच्या माध्यमातून दिलेला शब्द खरा केला आहे. विकासाचं हेच मॉडेल घेऊन आम्ही इथून पुढे जनतेची सेवा करत करत राहणार आहे.

